वाई खून खटल्यात माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास, आरोपी संतोष पोळने विचारले प्रश्न
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2023 03:57 PM2023-06-03T15:57:53+5:302023-06-03T15:58:21+5:30
राज्यभर गाजले होते वाई खून खटला प्रकरण
वाई : राज्यभर गाजलेल्या वाई खून खटल्याची सुनावणी वाई न्यायालयात सुरू असून, शुक्रवारी माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा उलट तपास सुरू झाला. आरोपी संतोष पोळ याने अनेक प्रश्न केले. यावेळी न्यायालयात सरकारी वकील ॲड. उज्वल निकम हेही उपस्थित होते. दरम्यान, पुढील सुनावणी १२ रोजी होणार आहे.
वाई खून खटल्याची अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. जी. नंदीमठ यांच्या न्यायालयात सुनावणी सुरु झाली आहे. संतोष पोळचे वकील ॲड. हुटगीकर यांनी वकीलपत्र काढून घेऊन यापुढे कामकाज चालविणार नसल्याचे पत्र न्यायालयास दिले. यानंतर संतोष पोळने या खटल्याचे मी स्वतः कामकाज चालविणार असल्याचे सांगितले. यावर न्यायालयाने त्याला याकामी विधी सेवा प्राधिकरणामार्फत मोफत वकील पाहिजे असल्यास उपलब्ध करून देऊ. माहितीतील दुसरा कोणताही वकील हवा असल्यास तुम्हाला दिला जाईल, असे सांगितले. मात्र, त्याने यास नकार दिला.
दरम्यान, या खटल्यात यापूर्वीच माफीची साक्षीदार ज्योती मांढरेचा जबाब नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे तिचा शुक्रवारपासूनच उलट तपास संतोष पोळ याने स्वतः घेतला. यावेळी तिला नथमल भंडारी यांच्या खुनानंतर तुम्ही कुठे गेला?, नंतर काय केले? असे प्रश्न विचारले. तुम्ही किती मोबाइल वापरत होता, तुमच्याकडे किती सिमकार्ड होते तसेच मोबाइलचे नंबरही पोळने विचारले. यानंतर तिने, मी दोनच मोबाइल वापरत असल्याचे व नंबर लक्षात नसल्याचे सांगितले. यावर, तुम्ही १३ सिमकार्ड वापरत होता. न्यायालयास खोटी माहिती देत असल्याचा प्रश्न पोळने केला. यावर ज्योती मांढरेने माझ्या मोबाइलबाबत काही आठवत नसल्याचे सांगितले.