अतिक्रमणांनी फुलले कऱ्हाडातील रस्ते !

By admin | Published: October 21, 2016 01:16 AM2016-10-21T01:16:41+5:302016-10-21T01:16:41+5:30

शहरात व्यापाऱ्यांकडून अतिक्रमण : वाहतूक कोंडीच्या समस्येत वाढ; ग्राहकांच्या आकर्षणासाठी दुकानाबाहेर स्टॉल; अतिक्रमण निर्मूलन पथकाचे दुर्लक्ष

Crossing roads in Karhad! | अतिक्रमणांनी फुलले कऱ्हाडातील रस्ते !

अतिक्रमणांनी फुलले कऱ्हाडातील रस्ते !

Next

कऱ्हाड : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी व्यापाऱ्यांकडून ना-ना तऱ्हेचे प्रकार अवलंबिले जातात. मग कुणी आकर्षक डिस्काऊंट आॅफर तर कुणी गिफ्टही देतात. मात्र, हे सर्व करत असताना शहरातील अतिक्रमणास आपणही जबाबदार असतो हे मात्र, ते विसरतात, अशी परिस्थिती सध्या कऱ्हाड शहरात निर्माण झाली आहे. सध्या दिवाळी जवळ आली असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी येथील छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानासमोर दर्शनी भागात विविध वस्तूंचे स्टॉल उभारले आहेत. विशेष म्हणजे हे वाहतुकीस अडथळा ठरत असून, त्याविरोधात पालिकेतील अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून दुर्लक्ष केले जात आहे.
अवघ्या दहा दिवसांवर दिवाळी आली असल्याने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बाजारपेठेत विविध मोठ्या-मोठ्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. नेहमीप्रमाणे याहीवर्षी ग्राहकांना आकर्षित योजना व डिस्काऊंट आॅफर देऊन त्यांना आपल्याकडील साहित्याची विक्री करण्याचे नियोजन काही व्यापाऱ्यांनी केले आहे.
शहरातील मुख्य तसेच अंतर्गत बाजारपेठेतील रस्त्यांवरच काही व्यापारी, व्यावसायिकांनी साहित्याचा बाजार मांडल्याने वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच रस्त्यांवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण करून करू नये. असे नियम पालिकेने घालून देऊनही ते बाजूला सारून रस्त्यावरच दुकानदारांकडून अतिक्रमण केले गेले आहे.
मात्र, अशा दुकानदार, व्यावसायिकांवर कोणत्याही प्रकारची कारवाई पालिकेतील अतिक्रमण निर्मूलन पथकाकडून केली जात नसल्याचे दिसून येत आहे.
दिवाळीचे औचित्य साधून कऱ्हाड शहरातील दत्त चौक ते दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ मार्गावर विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल दुकानदार, व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानांसमोर थाटले आहेत. शहरातील हा मार्ग नेहमीच ग्राहकांनी गजबजलेला असतो. या मार्गावर सोनेविक्री, भांडीविक्री तसेच कपडे विक्री करणाऱ्या दुकानांची मोठ्या प्रमाणात संख्या आहे. या ठिकाणी अरुंद रस्ता असल्याने दुकानाबाहेरच वाहनांचे पार्किंगही केले जाते. शिवाय अशात आता दिवाळीत विक्रीसाठी आणलेल्या नवीन साहित्य तसेच ड्रेसचे स्टॉल लावले आहेत. तर किराणामाल व्यापारी, दुकानदारांनी तर आपला गोडावूनमधील माल हा दुकानासमोरच रस्त्यावरच ठेवला आहे. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा ठरत आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्ते सध्या विविध फटाक्यांचे स्टॉल, कंदील, दिवाळी साहित्य, किराणामाल व कापड विक्रीचे स्टॉल, इलेक्ट्रॉनिक माळा दर्शनी भागात लावण्यात आलेल्या आहेत.
त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून चालताना अडथळा निर्माण होत आहे. तर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या उद्भवत आहे.
या अतिक्रमण करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांवर पालिकेतील अतिक्रमण निर्मूलन पथकाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)
चौकांत नियमांचे उल्लंघनशहरात मुख्य तीन तसेच अंतर्गत असलेल्या छोट्या रस्त्यांवर छोटी-छोटी दुकाने मांडून काही विके्रत्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. शहरातील चावडी चौक, दत्त चौक, सातशहीद चौक, पालिकामार्ग, कन्याशाळा मार्ग तसेच दिवंगत यशवंतराव चव्हाण स्मृतिस्थळ परिसर अशा अनेक ठिकाणी असलेल्या मुख्य चौकांसह अंतर्गत भागात व्यावसायिकांनी आपली दुकाने थाटली आहेत.
रुग्णवाहिकांनाही ‘नो एन्ट्री’
शहरातील मुख्य रस्त्यांवरूनच सध्या रुग्णवाहिका धावत आहेत. अंतर्गत रस्त्यांवर तसेच बाजारपेठ मार्गावर दुकाने थाटल्याने तसेच वाहनांचे अस्ताव्यस्त पार्किंग केले जात असल्याने त्यामधून रुग्णवाहिकेलाही जाता येत नाही. त्यामुळे अशा अतिक्रण करणाऱ्यांवर पालिकेने कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

Web Title: Crossing roads in Karhad!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.