इच्छुकांची गर्दी, नेत्यांची डोकेदुखी
By Admin | Published: May 26, 2015 10:25 PM2015-05-26T22:25:44+5:302015-05-27T00:56:33+5:30
कृष्णा कारखाना निवडणूक : उमेदवारीची लॉटरी कोणाकोणाला?--कृष्णेचं महाभारत
प्रमोद सुकरे - कऱ्हाड -यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. कारखान्याच्या इतिहासात यंदा प्रथमच तिरंगी लढतीचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांची भाऊगर्दीही वाढली आहे. त्यामुळे २१ उमेदवारांचे पॅनेल तयार करताना पॅनेलच्या नेत्यांची डोकेदुखी वाढलीय हे नक्की.
कृष्णेच्या निवडणुकीत ३३० इच्छुकांनी २९८ उमेदवारी अर्ज दाखल केलेत. मंगळवारी निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्जांची छाननी केली. त्यात फक्त दोन अर्ज अवैध ठरले. त्यामुळे इच्छुकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढली आहे.
कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी गटाचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांचे संस्थापक पॅनेल रिंगणात उतरले आहे. त्याविरोधात माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते व मदनराव मोहिते यांचे रयत पॅनेल तर डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे सहकार पॅनेल रिंगणात उतरत आहे. आजवर दुरंगी लढतीचे चित्र पाहिलेल्या सभासदांना यंदा तिरंगी लढतीचा अनुभव येणार आहे.
छाननीमध्ये अर्ज बाद होऊ शकतात हे गृहित धरून सर्वच पॅनेलप्रमुखांनी इच्छुकांना ‘अर्ज भरून तरी ठेवा; मग बघू,’ असे सांगून टाकले. प्रत्यक्षात छाननी छानच झाली म्हणे. त्यामुळे आता अनेक जण गुडघ्याला बांधलेलं बाशिंंग सोडायला तयार नाहीत. सत्ताधारी संस्थापक पॅनेलच्या माध्यमातून सुमारे १२० ते १३० जणांचे अर्ज दाखल आहेत. रयत पॅनेलच्या माध्यमातून सुमारे शंभर इच्छुकांचे अर्ज दाखल आहेत, तर सहकार पॅनेलच्या वतीने शक्तिप्रदर्शन करत सुमारे ६० ते ७० अर्ज भरण्यात आले. कारखान्याचे संचालक मंडळ हे २१ जणांचे आहे. त्यामुळे प्रत्येक पॅनेलमधून फक्त २१ उमेदवारांनाच उमेदवारी मिळू शकते. त्यामुळे यात कुणाकुणाला उमेदवारीची लॉटरी लागणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रत्येक पॅनेलप्रमुख सक्षम उमेदवार देण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यामुळे साऱ्यांचे समाधान होऊ शकले नाही हे निश्चित! नाराजी थोपविणेच पॅनेल प्रमुखांसमोरचे मुख्य आव्हान आहे.
आजपासून प्रचाराचे ‘नारळ’
कारखाना निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी गेल्या महिन्यापासून सुरू आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही झडल्या आहेत. पण प्रत्यक्ष प्रचाराचे नारळ कोणी फोडलेले नाहीत. अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील संस्थापक पॅनेलचा प्रचार शुभारंभ बुधवार दि. २७ रोजी विंग येथे होत आहे. डॉ. भारत पाटणकर यांच्या हस्ते शुभारंभ होणार आहे. रयत व सहकार पॅनेलही आपला अधिकृत प्रचार शुभारंभ कधी करणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.