‘चंदर’च्या अंत्यदर्शनासाठी राज्यभरातून गर्दी
By admin | Published: February 20, 2015 09:03 PM2015-02-20T21:03:09+5:302015-02-20T23:31:56+5:30
आवारवाडीवर शोककळा : नऊ स्पर्धांत प्रथम क्रमांक मिळवणारा बैल हरपला
पुसेगाव : आवारवाडी (विसापूर), ता. खटाव येथील अनिल काळू बुधावले यांचा बैलगाडी शर्यतीत महाराष्ट्र चॅम्पियन असणाऱ्या चंदर बैलाचे आजाराने निधन झाले. निधनाची बातमी समजताच महाराष्ट्रातून बैलगाडी शौकिनांनी थेट आवारवाडी गाठत त्याला श्रद्धाजंली वाहिली. त्याच्या निधनाने बैलगाडी शौकिनांमध्ये शोककळा पसरली आहे.मुंबई येथील एका शेठकडून शेतकरी अनिल बुधावले यांनी आठ महिन्यांपूर्वी बैलगाडी शर्यतीत नामांकित असणारा चंदर (मळा) हा बैल आठ लाख एक हजार रुपयांना विकत घेतला होता. बैल विकत घेण्यापूर्वी त्याने सुमारे १०५ फायनल घेतली होती. अनिल बुधावले यांच्याकडे आल्यानंतर चंदर बैलाने नामांकित बैलगाडी शर्यतीत नऊ ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवून आपला व मालकाचा नावलौकिक वाढविला होता.
खेडशिवापूर येथील बैलगाडी शैर्यतीत तर प्रथम क्रमांकाची दीड किलो वजनाची चांदीची गदा तसेच भिवरी, ता. भोर येथे ही प्रथम क्रमांक मिळवून दुचाकी त्याने जिंकली होती. याशिवाय बैलगाडी शर्यतीमध्ये नामांकित असणाऱ्या पुसेगाव, कोरेगाव, इस्लामपूर, कोळे यासह विविध ठिकाणची मैदाने त्याने सहजपणे मारली होती. चंदर (मळा) बैलगाडी शर्यतीच्या मैदानात येणार म्हटले की, बैलगाडी शौकीन एकाग्र होऊन त्याचा पळ पाहत होते. त्याचा पळ पाहिल्यानंतर बैलगाडी शर्यत शौकिनांचे डोळ्याचे पारणे
फिटायचे.अनिल बुधावले या शेतकऱ्यांने पारंपरिक छंद जोपासण्यासाठी आठ लाख रुपये खर्च करून चंदर विकत घेतला होता. मात्र, काही दिवसानंतर लगेचच बैलगाडी शर्यतीवर बंदी आली. त्यातच चंदरचे निधन झाल्याने अनिल बुधावले यांचे बैलगाडी शर्यतीचे स्वप्न अपुरे राहिले.चंदर बैलाची निधनाची बातमी समजताच बैलगाडी शौकिनांनी थेट आवारवाडी गाठत त्याला श्रद्धाजंली वाहिली. आपल्या लाडक्या चंदरला अखेरचा निरोप देताना अनेकांचे डोळे पाणावले होते. (वार्ताहर)