रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेला गर्दी, शेतक-यांमध्ये उत्साह, ३० ट्रॅक्टरचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2018 10:41 PM2018-04-03T22:41:50+5:302018-04-03T22:41:50+5:30
बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरीवर्गासह चालक-मालक व प्रेक्षकांच्यात यात्रा काळात प्रचंड नाराजी होती. मात्र, यावर तोडगा म्हणून यावर्षी गणेश मंडळे, ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीतर्फे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांबरोबरीने रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले.
वडूज: बैलगाडी शर्यतीवर बंदी असल्याने शेतकरीवर्गासह चालक-मालक व प्रेक्षकांच्यात यात्रा काळात प्रचंड नाराजी होती. मात्र, यावर तोडगा म्हणून यावर्षी गणेश मंडळे, ज्योतिर्लिंग यात्रा कमिटीतर्फे ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांबरोबरीने रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेच्या आयोजन करण्यात आले.
बहुतांशी कुटुंबाचे कुलदैवत असलेले श्री ज्योतिर्लिंग यात्रेनिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यामध्ये प्रामुख्याने या यात्रा काळातील खास आकर्षण ठरले ते रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धा. या स्पर्धेत जिल्ह्यातील शेतकरी ट्रॅक्टर चालकांनी हजेरी लावून स्पर्धेचा मनमुराद आनंद लुटला, तर वडूजकरांना ही स्पर्धा म्हणजे एक क्रीडा क्षेत्रातील पर्वणीच ठरली. बैलगाडीची शर्यत बंद झाल्याने शेतकरी वर्ग नाराज झाला होता. मात्र, रिव्हर्स ट्रॅक्टर स्पर्धेमुळे पुन्हा शेतक-यांचा उत्साह द्विगुणीत झाला.
या स्पर्धेत क-हाड, ओगलेवाडी, सदाशिवगड, बाबरमाची, सैदापूर, राजमाची, कार्वे, सुपने, कोरेगाव, वाकेश्वरसह वडूज पंचक्रोशीतील सुमारे तीस ट्रॅक्टर चालकांनी सहभाग नोंदविला होता. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धेत ट्रॅक्टर चालकांची कसब वाखणण्याजोगी होती. चार चाकोरीमधून सुमारे साडेसहाशे फूट अंतर ट्रॅक्टरचा रिव्हर्स गिअरमधून चालविण्याची अवलिलया चालकांची कला उपस्थितींच्या डोळ्यांचे पारणे फेडत होती. सायंकाळी उशिरा पार पडलेल्या या स्पर्धेत प्रथम क्रमांक २५ हजार रुपयांचे मानकरी वाकेश्वरचे नामदेव फडतरे, द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक १५ हजार रुपये क-हाडचे योगेश डुबल तर तृतीय क्रमाकांचे १० हजार रुपयांचे विजेते वडूजचे डॉ. संतोष गोडसे हे ठरले. या स्पर्धेतील विजेत्यांना यात्रा कमिटीच्या वतीने मानाचा फेटाही बांधण्यात आला.
या आगळ्यावेगळ्या स्पर्धेमुळे शेतकरी वर्गात नवचैतन्य निर्माण झाले असून, येथून पुढील यात्रा काळात अशा प्रकाराच्या स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, बुधवार दि. ४ एप्रिल रोजी कुस्त्यांचे जंगी मैदानाचे आयोजन करण्यात आले असून, वडूज पंचक्रोशीतील मल्लांनी व कुस्तीप्रेमींनी याचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.