गर्दीत छेड? तत्काळ हिसका!
By admin | Published: September 7, 2014 12:05 AM2014-09-07T00:05:15+5:302014-09-07T00:09:40+5:30
पोलीस यंत्रणा सज्ज : मंडळाचे कार्यकर्तेही मदतीसाठी सरसावले
सातारा : गणेशोत्सवात आता देखावे खुले झाल्याने साताऱ्याचे रस्ते रात्री गर्दीने फुलून जात आहेत. यात छेडछाड करणाऱ्यांची गर्दीही तितकीच असते. छेडछाड करणाऱ्यांना हिसका दाखवून तरूणींनी हा उत्सव साजरा करावा. यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून अनेक मंडळांनी आपल्या कार्यकर्त्यांवरही ही जबाबदारी सोपविली आहे.
यंदा सलग आलेल्या सुटीमुळे देखावे पाहण्यासाठी गर्दी होत आहे. ग्रामीण भागातूनही गाडी भरून लोक देखावे पाहण्याचा शहरात येत आहेत.
दरवर्षी गर्दीचा फायदा घेऊन युवती आणि महिलांशी अश्लील चाळे करणाऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. उगीच तमाशा नको म्हणून त्रास सहन करणाऱ्या काही जणी आहेत, तर आरे ला कारे करणाऱ्या काही रणरागिणी साताऱ्यात आहेत.
महिला आणि तरूणींची ही कोंडी लक्षात घेऊन यंदाही पोलिसांच्या वतीने गर्दी असणाऱ्या देखाव्यांच्या ठिकाणी साध्या वेशात महिला आणि पुरूष पोलिसांना तैनात केले आहे. याबरोबरच गर्दीच्या आणि शहरातील मुख्य चौकांमध्ये पोलीस गणवेशात उपस्थित असणार आहेत. ज्या महिला किंवा मुलींना अशांचा त्रास होईल, त्यांनी तातडीने संबंधिताविषयी तक्रार उपस्थित पोलिसांकडे करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)