वर्दळीचा खंबाटकी घाटही थबकला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:40 AM2021-04-16T04:40:44+5:302021-04-16T04:40:44+5:30
खंडाळा : सातारा-पुणे आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतूक नेहमी वर्दळीची आणि गतिमान असते. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन ...
खंडाळा : सातारा-पुणे आशियाई महामार्गावरील खंबाटकी घाटातील वाहतूक नेहमी वर्दळीची आणि गतिमान असते. कोरोनाच्या काळात राज्य सरकारने पुन्हा लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर वाहतूक पूर्णतः मंदावली. सार्वजनिक वाहतुकीला परवानगी असली तरी कोरोना प्रसाराच्या भीतीमुळे घाटात मात्र दळणवळण तुरळकच दिसून येत होती. त्यामुळे एरव्ही वाहनांच्या वर्दळीतील खंबाटकी घाटही थबकल्याचे चित्र पाहायला मिळते.
या महामार्गावरील खंडाळ्याच्या नजीक असलेल्या हरेश्वर डोंगररांगात असणारा खंबाटकी घाट हा दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. वास्तविक येथून मोठ्या प्रमाणात नेहमी वाहतूक सुरू असते.
खंबाटकी घाटातून साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहनांना घाट पार करून जावे लागते. मालवाहतूक ट्रक, खासगी चारचाकी वाहने, दुचाकी वाहने, बस यासह अन्य प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या प्रतिदिन ५५ हजारांवर दिसून येत होती. मात्र, कोरोना महामारीमुळे दळणवळणाला मोठा फटका बसला आहे. वास्तविक रविवारचा दिवस अथवा सुट्ट्यांचे दिवस असले की, थंडहवेच्या ठिकाणी आणि पर्यटनस्थळी जाणाऱ्या लोकांची संख्या मोठी असायची पण सध्या महाबळेश्वर, पाचगणी, तापोळा, ठोसेघर, कास पठार, यांसह अन्य पर्यटनस्थळे बंद असल्याने पर्यटकांना जाता येणार नाही. त्यामुळे घाटातून प्रवास करणाऱ्या वाहनांची संख्या मंदावली आहे.
खंबाटकी घाटात सध्या मालवाहतूक ट्रक, अत्यावश्यक कारणाने व खासगी कामाने बाहेर पडणारे मोजकेच लोकांची वाहने दिसून येत होती. दिवसभरात ही संख्या जेमतेम असल्यामुळे घाटातील वाहतूक तुरळक दिसून येत होती.
फोटो : मेल केला आहे :