Kaas plateau: धुक्यात हरवतंय कास, अंगावर जलधारा झेलत पर्यटक घेतायत पर्यटनाचा आस्वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 04:13 PM2022-07-11T16:13:50+5:302022-07-11T16:15:29+5:30
पावसात भिजण्याचा आनंद तसेच धबधब्यासमवेत, निसर्गासमवेत फोटोसेशन करण्याकडे पर्यटक आकर्षित
पेट्री (सातारा) : शहराच्या पश्चिमेला २५ किलोमीटर अंतरावर असलेले कास हे जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. कास परिसरात मान्सूनची दमदार सुरुवात झाली असून पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून पर्यटकांची कास तलावावर गर्दी होऊ लागली आहे. परिसरात आलेल्या बहुसंख्य पर्यटकांच्या गर्दीने कास तलाव बहरू लागला आहे. बहुसंख्य पर्यटकांनी रविवारी हजेरी लावत शेकडो दुचाकी, चारचाकी दिसून येत होत्या.
निसर्गरम्य परिसर, चोहोबाजूला दाट हिरवीगार झाडी, निसर्गाचे वरदान असलेल्या कास पर्यटनस्थळी पर्यटकांची सतत वर्दळ असते. सध्या पावसात भिजण्याचा आनंद तसेच धबधब्यासमवेत, निसर्गासमवेत फोटोसेशन करण्याकडे पर्यटक आकर्षित होत आहेत. कासला मंगळवार, शनिवार, रविवार सलग सुटीच्या दिवशी पर्यटक कुटुंबासमवेत फिरण्यास येत आहेत. कास तलावावर दिवसेंदिवस पर्यटकांची गर्दी वाढत आहे. कास तलावातील पाणीपातळी मोठ्याप्रमाणावर वाढल्याने तलावाच्या काठावर पर्यटक मौजमजा करत फोटोसेशन करताना दिसत होते. तसेच चारचाकी गाडीतील डेकवर नृत्याचा आनंद घेत आहेत. ठिकठिकाणी तरुणाई संगीताच्या तालावर ठेका घेत थिरकताना दिसत आहेत.
धुक्यात हरवतंय कास
परिसरात मागील आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू आहे. परिसरातील धबधबे मोठ्या प्रमाणावर कोसळतानाचे चित्र आहे. तसेच कास पठारासह कास तलाव परिसरात दिवसभर धुक्याची दुलई पाहावयास मिळत असल्याने पर्यटक जलधारा झेलत गुलाबी थंडीचा आस्वाद घेत आहेत.
पावसाळ्यात कास तलाव परिसरात पर्यटनासाठी आमची नेहमी सफर असते. येथील निसर्ग आम्हाला नेहमीच भावतो. परिसरातील आल्हाददायक वातावरण मन भारावून टाकतो. - प्रतीक फडतरे, पर्यटक, सातारा