स्मशानभूमीत विधींसाठी गर्दी; संगम माहुली ग्रामस्थांना धसका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:41 AM2021-05-09T04:41:11+5:302021-05-09T04:41:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : येथील कैलास मशानभूमीमध्ये रोज ३० ते ४० अंत्यविधी होत असून सावडणे, दहावा या विधींसाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : येथील कैलास मशानभूमीमध्ये रोज ३० ते ४० अंत्यविधी होत असून सावडणे, दहावा या विधींसाठी मृतांचे नातेवाईक मोठ्या प्रमाणावर गर्दी असलेले करत असल्याने संगम माहुली ग्रामस्थांनी धसका घेतला आहे. या विधींसाठी केवळ पाच लोकांना परवानगी देण्याचा निर्णय ग्रामपंचायतीने घेतला आहे.
संगम माहुली गावात श्री बालाजी ट्रस्टमध्ये जिल्ह्यातील कोरोना पेशंटचे अंत्यसंस्कार जास्त होत असल्याने दुसऱ्या दिवशीचा धार्मिक विधीला बाहेर गावावरून मोठ्या प्रमाणावर लोक गर्दी करतात. तरी संगम माहुली गावात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग वाढला असून, ग्रामपंचायत धार्मिक विधीसाठी फक्त ५ लोकच सोडत आहे. बाहेर गावातील लोकांनी काळजी घ्यावी. जास्त लोकांना गावात सोडले जात नाही.
अंत्यविधीनंतर ज्या विधी केल्या जातात, त्यासाठी मृतांचे नातेवाईक गर्दी करतात, वास्तविक प्रशासनाने दिलेल्या सूचनांनुसार कुठेही गर्दी करणे टाळायचे आहे. मात्र, कोरोनाने मृत्यू होऊन देखील लोक स्मशानभूमीत गर्दी करू लागलेले आहेत. या गर्दीमुळे संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हे लक्षात घेऊन नागरिकांनी अंत्यविधीसाठी गर्दी न केलेली चांगली. सध्या संगम माहुली मध्ये ७० ते ८० लोक कोरोनाबाधित आहेत. चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अवघ्या दीड हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. स्मशानभूमीत जे विधी केले जातात, त्यासाठी संगम माहुलीतील भडजींना बोलावले जाते, त्यांच्या माध्यमातून देखील संसर्ग वाढू शकतो. हे लक्षात घेऊन नागरिकांनी स्मशानभूमीत गर्दी करू नये, असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेले आहेत.
कोट
कोरोनाचा संसर्ग किती गतीने वाढतोय हे सर्वांना माहीत आहे. संपूर्ण जिल्ह्यातून सातारा येथे उपचारासाठी रुग्ण येत असतात. त्यापैकी ४० ते ४५ लोक रोज मृत्युमुखी पडत आहेत. त्यातील बहुतांश मृतदेहांवर संगम माहुलीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. ग्रामस्थांना संसर्ग होण्याची भीती असल्याने लोकांनी स्मशानभूमीत गर्दी करू नये.
प्रवीण शिंदे, सरपंच, संगम माहुली