थंडी अन् करपाचा हळद पिकाला फटका : शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2019 12:11 AM2019-02-01T00:11:15+5:302019-02-01T00:11:58+5:30
वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली
तानाजी कचरे।
बावधन : वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्या हळद काढणीची कामे जोमाने सुरू असली तरी पिकाला अपेक्षित दर मिळेल की नाही? या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.
बावधन परिसरात यंदा ३९० एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड केली आहे. यापैकी १८० एकर विहीर पाण्यावर, १५५ एकर पाटपाणी तर ५५ एकर क्षेत्रातील हळद लागवड ठिबकवर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात हळदीची लागवड झाली. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने पिकाची पूर्ण वाढ झाली नाही. त्यातच नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या पिकाला पोषक असलेल्या वातावरणाची निर्मिती न झाल्याने यंदा हळद उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.
हळदीला चांगला दर मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी हळदीचा साठा करून ठेवला आहे. परंतु यंदा अपेक्षित दर मिळण्याची खात्री नसल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हळदीला यंदा प्रति क्विंटल १५ ते १७ हजार रुपये दर मिळाला तर उत्पादित खर्च जाऊन काही रक्कम शेतकºयाच्या खिशात पडू शकते. मात्र, दर कमी मिळाल्यास याचा मोठा फटका शेतकºयांना बसू शकतो.
एकरी लाख रुपये खर्च
एक एकर क्षेत्रात हळद लागवड करण्यासाठी शेतकºयांना सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. नांगरट, कुळवणी, सरी यासाठी नऊ हजार रुपये, सेंद्रिय व रासायनिक खतांसाठी ३१ हजार रुपये, भिजवणी भर लावणे व भांगलणी मजुरी यासाठी २२ हजार रुपये तर पाला कापणी, हळद काढणे, ती शिजवणे व पॉलिश करणे यासाठी २३ हजार रुपये, हळद बियाणे १० हजार रुपये असा सुमारे एक लाख रुपये खर्च हळद लागवडीसाठी करावा लागतो.
गेल्या काही वर्षांपासून उसाचे प्रश्न आंदोलनाद्वारे सोडविले जात आहेत. परंतु हळद पिकाला आधारभूत किंमत मिळत नाही. गेल्या वर्षी अपेक्षित दर न मिळाल्याने चार टनांहून अधिक हळद साठवून ठेवली आहे. त्यातच यंदा हळदीला पोषक वातावरण नसल्याने उत्पादनात घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
- देवराम ठोंबरे, शेतकरी