कुसवडेत गांजाची लागवड; नागठाणेत विक्री, बोरगाव पोलिसांची धडक कारवाई
By दत्ता यादव | Published: October 29, 2023 06:49 PM2023-10-29T18:49:07+5:302023-10-29T18:49:20+5:30
सहा किलो गांजा हस्तगत
सातारा : बोरगाव पोलिसांनी एकाच दिवशी दोन ठिकाणी गांजा लागवड आणि विक्रीच्या ठिकाणी छापा टाकून दोघांना अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून सुमारे १ लाख ५६ हजार रुपये किमतीचा तब्बल ६ किलो ३५० ग्रॅम वजनाचा गांजा हस्तगत केला. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी सायंकाळी केली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बोरगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांना खबऱ्याकडून गांजाची लागवड आणि विक्रीसंदर्भात माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पथक तयार करून स्वत: कारवाईसाठी रवाना झाले. कुसवडे, ता. सातारा या गावातील अशोक पांडुरंग पवार याने त्याच्या राहत्या घराजवळ गांजाच्या झाडांची लागवड केली असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी ५ किलो १३० ग्रॅम वजनाचा एकूण १ लाख २८ हजार ५०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. या कारवाईनंतर पोलिसांनी आपला मोर्चा नागठाणे येथे वळवला.
या ठिकाणी अमोल आण्णा मोहिते हा त्याच्या घराजवळ गांजाची विक्री करत होता. पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले. त्याच्या ताब्यातून १ किलो १२० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात स्वतंत्र दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील एका गुन्ह्याचा तपास सहायक पोलिस निरीक्षक वर्षा डाळिंबकर तर दुसऱ्या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक राजाराम निकम हे करीत आहेत.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे, हवालदार अमोल सपकाळ, दादा स्वामी, सुनील कर्णे, दीपक मांडवे, प्रशांत चव्हाण, नम्रता जाधव, संजय जाधव, दादा माने यांच्यासह फाॅरेन्सिक युनिटच्या कर्मचाऱ्यांनी या कारवाईत भाग घेतला.
श्वानाकडूनही महत्त्वाची कामगिरी
नागठाणे येथे घरात गांजा शोधताना श्वानाने महत्त्वाची कामगिरी बजावली. गांजा नेमका कुठे लपवून ठेवला, हे श्वानाने शोधून काढलं. त्यानंतर पोलिसांनी घरातून गांजा हस्तगत केला. एका पोत्यामध्ये हा गांजा ठेवण्यात आला होता.