Satara: आल्याच्या शेतात गांजाची लागवड, २७ लाखांचा मुद्देमाल जप्त
By नितीन काळेल | Published: October 26, 2023 07:04 PM2023-10-26T19:04:47+5:302023-10-26T19:06:02+5:30
सातारा : सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे आल्याच्या शेतात गांजाची १८ झाडे आढळून आली. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई करुन ...
सातारा : सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे आल्याच्या शेतात गांजाची १८ झाडे आढळून आली. याप्रकरणी संबंधित शेतकऱ्यावर पोलिसांनी कारवाई करुन सुमारे १०० किलोहून अधिक गांजा जप्त केला. याची किंमत २७ लाख रुपयांवर आहे. तर याप्रकरणी संबंधितांवर बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हाही नोंद झाला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, पोलिस अधीक्षक समीर शेख आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक आॅंचल दलाल यांनी अंमली पदाऱ्थांची लागवड आणि वाहतूक करणाऱ्यांवर कारवाईची सूचना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना केली होती. त्याप्रमाणे देवकर यांनी सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे आणि उपनिरीक्षक पतंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली पथक तयार करुन कारवाईबाबत सूचना केली होती.
दरम्यान, आज, गुरुवारी (दि. २६) पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदाराकडून सातारा तालुक्यातील खोजेवाडी येथे लहू कुंडलिक घोरपडे (वय ६२) याने मानकर नावाच्या शिवरात आले पिकात गांजाची लागवड विक्री करण्याच्या उद्देशाने केल्याचे समजले. या माहितीच्या आधारे त्यांनी पथकाला कारवाईची सूचना केली. त्यानुसार खोजेवाडी जाऊन आले पिकात पाहणी केल्यावर गांजाची लागवड केल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे पोलिसांनी कारवाई केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुधीर पाटील, रवींद्र भोरे, उपनिरीक्षक पंतग पाटल, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, लक्ष्मण जगधने, शिवाजी गुरव, हसन तडवी, शिवाजी भिसे, राजू कांबळे, गणेश कापरे, अमित माने, ओमकार यादव, धीरज महाडिक, प्रवीण पवार, वैभव सावंत, संकेत निकम, संभाजी साळुंखे आदींनी कारवाईत सहभाग घेतला.
१०९ किलो वजन..
पोलिसांनी गुंगीकारक आैषधी द्रव्ये आणि मनोव्यापाऱ्यावर परिणाम करणारे अधीनियम १९८५ मधील तरतुदीनुसार शेतातील गांजाची १८ झाडे जप्त केली आहेत. त्याचे वजन १०९ किलो भरले. तसेच या गांजाच्या झाडांची किंमत २७ लाख ३४ हजार ५०० रुपये इतकी आहे. तर जमीन मालकाविरोधात बोरगाव पोलिस ठाण्यातही गुन्हा नोंद झाला आहे. याबाबत पोलिसांकडून सखोल तपास केला जात आहे.