रात्री अकरा नंतर संचारबंदी केवळ नावालाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:10+5:302021-03-04T05:15:10+5:30
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ...
सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सातारकरांना या गोष्टीचा विसर पडल्याचे दिसते. रात्री ११ नंतर शहरात पोलीस गस्त नसल्याने नागरिक निर्धास्तपणे वावरतात. वाहतूकही सुरू असते. त्यामुळे संचारबंदी केवळ नावालाच आहे की काय? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लागले आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलली असून, त्याची अंमलबजावणीही केली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दि. २२ फेब्रुवारीला जिल्ह्यात रात्री ११ ते पहाटे ६ या कालावधीत जिल्ह्यात संचारबंदी लागू होत असल्याची घोषणा केली होती. या निर्णयाची काटेकोर अंंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी प्रशासनाला दिले. ग्रामीण भागात या आदेशाचे काटेकोर पालन केले जात असले तरी शहरी भागात मात्र संचारबंदी नावालाच असल्याचे दिसते.
रात्री अकरानंतर शहरातील प्रमुख चौकांत पोलीस कर्मचारी नसल्याने रस्त्यावर फेरफटका मारणाऱ्यांची संख्या मोठी आहे. अकरानंतरही वाहनधारकांची ये-जा सुरू असते. अकरा वाजले तरी आईस्क्रिम व इतर खाद्यपदार्थांच्या गाड्या सुरूच असतात. पोलीस प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेणे गरजेचे बनले आहे.
फोटो : १
पोवई नाका
आठ रस्ते एकत्र जोडणाऱ्या पोवई नाका परिसरात रात्री अकरानंतरही वाहनांची ये-जा सुरू होती. यामध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वारांची संख्या लक्षणीय होती.
फोटो : २
शाहू चौक
पालिकाजवळील शाहू चौकात पोलीस कर्मचारी नसल्याने रात्री अकरानंतरही या ठिकाणाहून वाहनधारकांची रेलचेल सुरू होती. रस्त्याकडेला गप्पा मारणाऱ्यांची संख्याही मोठी होती.
फोटो : ३
मोती चौक
मोती चौक हा नेहमीच गजबजलेला असतो. रात्री अकरा वाजता येथे आईस्क्रिमच्या गाड्यावर नागरिकांची गर्दी होती. राजपथावर शतपावलीसाठी आलेल्यांची संख्याही अधिक होती.
फोटो : ४
राजवाडा : चांदणी चौक
या चौकात अनेक हातगाडीधारकांची रात्री अकरा वाजता हातगाडी बंद करण्याची लगबग सुरू होती. हे चित्र दररोज पाहावयास मिळते. या चौकात चारचाकी वाहने व रिक्षांची ये-जा पहायला मिळाली.
(चौकट)
आतापर्यंत एकावरही
गुन्हा दाखल नाही
१. पालकमंत्र्यांनी संचारबंदीची घोषणा करून आज दहा दिवस झाले. या कालावधीत संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून जिल्ह्यात एकही कारवाई अद्याप झाली नाही.
२. कारवाईची होत नसल्याने शहरी भागातील नागरिक व वाहनधारक निर्धास्त झाले असून, त्यांच्यावर कोणाचाही अंकुश नाही.
३. पोलीस प्रशासाने संचारबंदी नियमांची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.
(कोट)
संचारबंदीच्या काळामध्ये रस्त्यावर कोणी आढळून आल्यास त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सर्व नागरिक व वाहनधारकांनी पालकमंत्र्यांच्या आदेशाचे पालन करावे. जे कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर गुन्हेही दाखल करण्यात येतील.
- अण्णासाहेब मांजरे, पोलीस निरीक्षक