चाफळला राम मंदिर परिसरात संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:32 AM2021-01-14T04:32:04+5:302021-01-14T04:32:04+5:30
उंब्रज : चाफळ (ता. पाटण) येथे १४ जानेवारी रोजी होणारी सीतामाई यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी यादिवशी राम ...
उंब्रज : चाफळ (ता. पाटण) येथे १४ जानेवारी रोजी होणारी सीतामाई यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांनी यादिवशी राम मंदिरात गर्दी करू नये. त्यामुळे प्रशासनाने १४ जानेवारी रोजी दिवसभर राम मंदिराच्या दोनशे मीटर परिसरात संचारबंदी व जमावबंदी आदेश लागू केला आहे. १४ जानेवारी रोजी भाविकांनी मंदिर परिसरात दर्शनासाठी येऊन गर्दी करू नये. तसेच महिलांनी चाफळ राम मंदिर येथे वसा घेण्यासाठी येवू नये. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे. नियमाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उंब्रज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिला आहे.
शिवाजी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धांना प्रतिसाद
मसूर : येथील शिवाजी विद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी विद्यालयातील इतिहास विभागाने वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. स्वराज्यजननी जिजामाता व स्वामी विवेकानंदांच्या विचारातील युवक या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यात प्राची घोलप हिने प्रथम, ज्योती सूर्यवंशी हिने द्वितीय तर जयवर्धन पाटील याने तृतीय क्रमांक प्राप्त केला. यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन मुख्याध्यापक ए. बी. चव्हाण यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष जयवंत पाटील, खजिनदार संजय बदियानी, प्रकाश पाटील, आर. व्ही. मुळे, पी. एस. माने यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
बनवडी फाट्यावर मोकाट श्वानांची दहशत वाढली
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली हद्दीतील सिंदल ओढा ते बनवडीफाटा दरम्यान मोकाट श्वानांचा वावर वाढल्यामुळे वाहनधारक तसेच शेतकऱ्यांनाही नाहक त्रास सहन करावा लागत आहे. कऱ्हाड -मसूर रस्त्यावरून मोकाट श्वान फिरत असतात. अचानक वाहनांच्या समोर श्वान आल्याने अपघात घडत आहेत. तर बनवडी फाटा येथे हे श्वान मोठ्या प्रमाणावर वावरत असतात. रस्त्यावरच ते ठाण मांडून बसत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीने श्वानांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कऱ्हाड -मसूर रस्त्यावर अस्ताव्यस्त पार्किंग
कोपर्डे हवेली : सध्या विविध सणांना सुरुवात झाल्याने विद्यानगरमधुून जात असलेल्या कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर लोकांची गर्दी वाढली असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुचाकी तसेच चारचाकी वाहने पार्क करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यानगरला रस्त्यानजीक अनेक दुकाने आहेत. या दुकानांमध्ये अनेकजण खरेदीसाठी येतात. मात्र, त्यांची वाहने रस्त्यावरच उभी असतात. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे.
कऱ्हाड ते विटा रस्त्याला अतिक्रमणाचा विळखा
कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा रस्त्यावर अतिक्रमण वाढले असून रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. तसेच वाढलेली बेसुमार झाडेझुडपे, घाणीचे साम्राज्य, रस्त्यावरील मोठे खड्डे, वाहन पार्किंगसाठी जागेचा अभाव आदी गंभीर समस्यांमुळे वाहनधारकांसह प्रवासी त्रस्त झाले आहेत. कऱ्हाड -पंढरपूर-विजापूर हा राज्यमार्ग असून त्याला केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गाची मान्यता दिली आहे. त्यामुळे रस्त्याला वाढते महत्त्व आले असून ही परिस्थिती लक्षात घेऊन बांधकाम विभागाने रस्त्यानजीकचे अतिक्रमण हटवावे, अशी मागणी केली जात आहे.