फलटणला मकरसंक्रांतीदिवशी श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:27+5:302021-01-13T05:42:27+5:30
फलटण : फलटणकरांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम मंदिरात सीतामाईचा संसार पाहण्यासाठी प्रतिवर्षी मकरसंक्रांती दिवशी हजारो महिलांची झुंबड असते. परंतु ...
फलटण : फलटणकरांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम मंदिरात सीतामाईचा संसार पाहण्यासाठी प्रतिवर्षी मकरसंक्रांती दिवशी हजारो महिलांची झुंबड असते. परंतु यावर्षी कोरोना म्हणजेच कोविड १९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी मकरसंक्रांती दिवशी फलटण येथील श्रीराम मंदिर परिसरात संचारबंदीचे आदेश पारित करण्यात आलेले आहेत. त्यामुळे रामवसा घेण्यासाठी महिलांनी गर्दी करू नये, असे आवाहन फलटणचे प्रांताधिकारी शिवाजीराव जगताप यांनी केलेले आहे.
फलटणच्या श्रीराम मंदिरात प्राचीन काळापासून श्री सीतामाई देवीचा संसार ठेवण्यात आलेला आहे. प्रतिवर्षी श्री सीतामाईचा संसार पाहण्यासाठी व रामवसा घेण्यासाठी महिला येत असतात; परंतु यावर्षी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभू श्रीराम मंदिर परिसरामध्ये रामवसा घेण्यासाठी कोणीही येऊ नये. त्याऐवजी आपापल्या घरातूनच प्रभू श्रीराम व सीतामाईला स्मरण करावे. यावर्षी मकरसंक्रांती दिवशी श्रीराम मंदिर परिसरामध्ये कडक संचारबंदी घोषित केलेली आहे. जर कोणी श्रीराम मंदिरात येण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असेही प्रांताधिकारी जगताप यांनी स्पष्ट केले.