संचारबंदीचे उल्लंघन; वऱ्हाडी मंडळींवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:41 AM2021-05-06T04:41:14+5:302021-05-06T04:41:14+5:30
पाचगणी : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील हमिदा बंगल्यात लग्नाच्या रिस्पेशन पार्टीत मुंबईच्या उच्चभ्रू मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू ...
पाचगणी : कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील हमिदा बंगल्यात लग्नाच्या रिस्पेशन पार्टीत मुंबईच्या उच्चभ्रू मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेल्या संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचगणीचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी वऱ्हाडी मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.
याबाबतची मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मुंबई येथून काही लोक लग्नकार्याकरिता पाचगणीत आले होते. या सर्व वऱ्हाडी मंडळींची राहण्याची सोय कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील सागर तराळ याने त्यांच्या हमिदा बंगला या वऱ्हाडी मंडळींना भाड्याने दिला होता. जिल्ह्यात कोरोना संचारबंदीचे नियम असताना हे सर्व नियम पायदळी तुडवीत वऱ्हाडी मंडळींना बंगला भाड्याने घेऊन गर्दी केली आणि कोविडच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सागर तराळसह आयोजकांवर पाचगणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मात्र, लग्न झाल्यानंतर वऱ्हाडी मंडळींनी रात्री संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन करीत पार्टी केल्याचे पोलिसांना समजताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आयोजकांवर गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चौकट:
मुंबईहून पाचगणीत लग्नाकरिता आलेल्या लोकांनी कोरोना निगेटिव्ह टेस्ट प्रमाणपत्र, तसे जिल्हा ई-पास अशा अटी व शर्तींचे पालन केले होते. मात्र, तरीही त्यांच्यावर संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यात आला.
०५कासवंड
कासवंड (ता. महाबळेश्वर) येथील फार्महाऊसवर गर्दी झाली होती.