सातारी पाण्याची राजस्थानला उत्सुकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2016 12:03 AM2016-01-17T00:03:21+5:302016-01-17T00:33:34+5:30
‘जलयुक्त शिवार’चा डंका : पथक पाहणी करणार; दौऱ्यात १५ जणांचा समावेश
सातारा : ‘जलयुक्त शिवार’ अभियानांतर्गत जिल्ह्यात झालेल्या कामांचा डंका जुलै २०१५ मध्ये राजस्थानमध्ये वाजला होता. या अभियानाच्या धर्तीवर राजस्थानमध्येही कामे करण्याचा मुख्यमंत्री वसुंधराराजे यांचा विचार आहे. जिल्ह्यातील जलयुक्तमधील कामांची पाहणी करण्याकरिता राजस्थानच्या तीन आमदारांचा समावेश असलेले १५ जणांचे पथक सोमवारी सातारा दौऱ्यावर येत आहे.
राज्य शासनाने सर्वांसाठी ‘पाणी २०१९’ या उपक्रमांतर्गत जलयुक्त शिवार अभियान राबवून राज्यातील हजारो गावे दुष्काळमुक्त करण्याचा विडा उचलला आहे. हे अभियान यशस्वी ठरले असून, सातारा जिल्ह्यात या अभियानाअंतर्गत पहिल्या टप्प्यात २१५ गावांमध्ये अनेक उत्कृष्ट कामे झालेली आहेत. त्यामुळे पाणीसाठा वाढीस मदत झाली आहे. येथील जलयुक्तच्या कामाचा डंका सर्वत्र पोहचला आहे. त्यामुळे येथील कामे पाहण्यासाठी विविध राज्यातील अभ्यासक येत आहेत.
राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधराराजे यांनीही याची दखल घेऊन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना सातारा जिल्ह्यात झालेल्या कामांच्या सादरीकरणासाठी जुलै महिन्यामध्ये राजस्थानमध्ये निमंत्रित केले होते. राजस्थानमधील झालावाड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विष्णू चरण मल्लिक यांनी नुकतेच एक पत्र जिल्हाधिकारी मुदगल यांना पाठविले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाच्या या मोहिमेचा आदर्श घेऊन राजस्थान शासनाने मुख्यमंत्री ‘जलस्वावलंबन अभियान’ नावाने ग्रामीण भागामध्ये अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्र राज्यात लोकसहभागातून जलसंधारणाची उत्कृष्ट कामे झाली आहेत. सातारा जिल्ह्यात या अभियानांतर्गत उत्कृष्टपद्धतीने झालेल्या कामांचे सादरीकरण जयपूर येथे करण्यात आले होते. याची दखल घेऊन राजस्थानमध्ये झालावाड जिल्ह्यात कामे करण्यात येत आहेत. त्याच्या अधिक अभ्यासासाठी १५ जणांचे पथक पाठवत आहोत. हे पथक सोमवारी साताऱ्यात दाखल होत असून, सोमवार, मंगळवार या दोन दिवसांत कामाची पाहणी करणार आहे. (प्रतिनिधी)
राजस्थानच्या पथकात लोकप्रतिनिधीही...
खानापूरचे आमदार नरेंद्र नागर, डगचे आमदार रामचंद्र सुनारीवाल, मनाहरथानाचे आमदार कंवर लाल मीणा, टीना भील, झालावाडचे जिल्हाधिकारी विष्णू चरण मल्लिक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामपाल शर्मा, पंचायत समितीचे सभापती कन्हैयालाल पाटीदार, बैनाथ मीणा, रमेशचंद मेघवाल, मोरमबाई तंवर, प्रगतशील शेतकरी राकेश भील, उपवन संरक्षक सी. आर. मीणा, इंद्रजित निमेश, अजित जैन, ब्रजपाल सिंह.