साताऱ्यात राष्ट्रवादीचे ठरले..भाजप उदयनराजेंना उमेदवारी देणार?
By दीपक शिंदे | Published: April 11, 2024 03:30 PM2024-04-11T15:30:25+5:302024-04-11T15:31:35+5:30
उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याला अधिकृतता मिळणे आवश्यक
सातारा : शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रतीक्षेनंतर आपला उमेदवार जाहीर केला. खरं तर महायुतीचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी आपला उमेदवार जाहीर करणार होती. पण, अजून वेळ करण्यात काहीच अर्थ नसल्याचे सांगत शरद पवार यांनी आपला साताऱ्याचा उमेदवार जाहीर केला. आता फक्त भाजपकडून कोणाचे नाव यादीत येते याची उत्सुकता लागली आहे. उदयनराजेंची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्याला अधिकृतता मिळणे आवश्यक आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या सर्वच सदस्यांनी सहमती दर्शविली आहे. महाविकास आघाडीने सुरुवातीपासूनच मेळाव्यांना सुरुवात केली होती. फक्त उमेदवार ठरत नव्हता. आता उमेदवारीची अधिकृत घोषणा झाल्याने सभा आणि मेळाव्यांना अधिक गती येईल.
महायुतीनेही मेळावे आणि प्रचार दौऱ्यांना सुरुवात केली असली तरी त्यांनी अजूनही आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. त्यामुळे सर्वच जण बुचकळ्यात आहेत. महायुतीमधून अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीबाबत स्पष्टता जाणवत नाही. मात्र, महायुतीतील अनेक नेते उदयनराजे भोसले यांचे उघड नाव घेऊन तेच उमेदवार असतील, असे ठामपणे सांगत आहेत.
भाजप धक्कातंत्रासाठी आघाडीवर
भारतीय जनता पार्टी धक्कातंत्रासाठी ओळखली जाते. त्यामुळे ऐनवेळी वेगळा उमेदवार देण्याचीही खेळी खेळली जाऊ शकते. माथाडी कामगार चळवळीतील उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसने दिल्यामुळे महायुतीमध्येही नरेंद्र पाटील यांच्या रुपाने एक नेता त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे ऐनवेळी भाजप काहीही निर्णय घेऊ शकते. त्यामुळे उमेदवाराबाबत अजूनही धास्ती आहे.
उमेदवारी मिळण्याबाबत उदयनराजे मात्र ठाम
भारतीय जनता पक्षाकडून आपल्यालाच उमेदवारी मिळणार यावर खासदार उदयनराजे भोसले ठाम आहेत. केवळ मोठा पक्ष असल्यामुळे आणि अनेक जागांवरील उमेदवार अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने थोडा उशीर लागत आहे, असे त्यांनी कऱ्हामध्येही स्पष्ट केले आहे.