मुद्रा कर्जयोजना होणार सक्षम
By admin | Published: December 30, 2015 10:28 PM2015-12-30T22:28:30+5:302015-12-31T00:32:51+5:30
बँकांतर्फे ग्वाही : ‘युक्रांद’च्या हलगी आंदोलनास यश
सातारा : मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवकांना जास्तीत जास्त लाभ मिळण्याच्या दृष्टीने ही योजना अधिक सक्षम करण्यात येईल आणि तशा सूचना सर्व बँकांना दिल्या जातील, असे आश्वासन अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांनी दिले आहे. यासंदर्भात मंगळवारी (दि. २९) युवक क्रांती दलातर्फे हलगी आंदोलन करण्यात आले होते. हे आंदोलन यशस्वी झाल्याचे ‘युक्रांद’ने म्हटले आहे.कर्ज मागण्यास गेलेल्याचे खच्चीकरण करणे, परस्पर विमा उतरवून कर्जखात्यात टाकणे, शासनाच्या दरानुसार व्याज न घेता मनमानी आकारणी, पूर्वी माफ झालेल्या कर्जांची काही वर्षांनी पुन्हा वसुली, कर्जदारावर ग्राहक न्यायालयात खटले भरणे, माफ झालेल्या कर्जांबाबत महामंडळाकडून कर्जमाफीपत्र आणण्यास सांगणे तसेच पंतप्रधान मुद्रा योजना व इतर योजनांबाबत सहकार्य न करणे असे आरोप ‘युक्रांद’तर्फे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आले होते. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हलगी आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला होता.
दरम्यान, अग्रणी जिल्हा व्यवस्थापक महादेव शिरोळकर यांच्याशी जिल्हाधिकाऱ्यांनी चर्चा केल्यानंतर मुद्रा योजनेअंतर्गत अधिक चांगले काम करण्याच्या सूचना राष्ट्रीयीकृत बँकांना देण्यात येतील, असे आश्वासन शिरोळकर यांनी दिले. तसेच कोणत्याही बँकेबद्दल तक्रार असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.
‘जिल्ह्यात या योजनेअंतर्गत चांगले काम सुरू आहे. डिसेंबरमध्ये तालुकास्तरीय बैठकीत सर्व बँकांना या योजनेतील कर्जवाटप करण्यास सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली २२ रोजी नियोजन भवनात झालेल्या बैठकीतही सूचना केल्या आहेत, असे शिरोळकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)