कोरेगाव मतदारसंघातील 'त्या' ऑडिओ क्लिपची चौकशी करा, लेखी तक्रार दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:36 PM2024-11-16T12:36:56+5:302024-11-16T12:38:58+5:30

शशिकांत शिंदे यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

currently an audio clip is viral, giving a wrong message from the order of candidates on the electronic voting machine In Koregaon Constituency | कोरेगाव मतदारसंघातील 'त्या' ऑडिओ क्लिपची चौकशी करा, लेखी तक्रार दाखल 

कोरेगाव मतदारसंघातील 'त्या' ऑडिओ क्लिपची चौकशी करा, लेखी तक्रार दाखल 

कोरेगाव : ‘कोरेगाव विधानसभा मतदारसंघात सध्या इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवरील उमेदवारांच्या क्रमावरून चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ही ऑडिओ क्लिप नेमकं कोण व्हायरल करत आहे, याचा शोध पोलिसांनी तसेच निवडणूक आयोगाने घ्यावा,’ अशी मागणी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी केली आहे. दरम्यान, या संदर्भात निवडणूक आयोगाकडे आजच लेखी स्वरूपात तक्रार दाखल केल्याचे त्यांनी सांगितले.

कोरेगाव विधानसभा मतदारसंघात प्रचारादरम्यान शुक्रवारी दुपारी दोन वाजता पत्रकारांशी बोलताना वरील माहिती दिली. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर क्रमांक एकवर आ. महेश शिंदे हे उमेदवार आहेत, तर क्रमांक दोनवर आ. शशिकांत शिंदे हे उमेदवार आहेत. मात्र, या संदर्भात चुकीचा संदेश देणारी ऑडिओ क्लिप मतदारसंघात व्हायरल झाली असून त्यामध्ये एक नंबरला मत दिले की शशिकांत शिंदेंना जाईल, असे म्हटले आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार केली आहे, अशी माहिती महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली. 

यावेळी त्यांनी मतदारसंघात विरोधकांकडून सुरू असलेल्या दबावतंत्राची माहिती दिली. पोलिस यंत्रणा पूर्णपणे दबावाखाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे तक्रार करूनही ते लक्ष देत नाहीत. कोणत्या हॉटेलवर कुठले गुंड उतरले आहेत, कोण ऑडिओ क्लिप वायरल करत आहे, याबाबत पोलिसांनी माहिती घेऊन कारवाई करण्याची गरज आहे. मात्र, पोलिस यंत्रणा त्याकडे लक्ष देत नसल्याची खंत आमदार शिंदे यांनी व्यक्त केली.

या संदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे लेखी स्वरूपात तक्रार आजच दाखल केला आहे. एकंदरीत विरोधकांना निवडणूक अवघड वाटू लागली आहे. कारण सर्वसामान्य जनतेने निवडणूक हातात घेतली आहे. सामान्य जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले.

Web Title: currently an audio clip is viral, giving a wrong message from the order of candidates on the electronic voting machine In Koregaon Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.