कढीपत्ता ठरणार जवळवाडीची नवी ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:26 AM2021-06-26T04:26:57+5:302021-06-26T04:26:57+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : स्त्रिया मुलांप्रमाणेच मायेने आणि प्रेमाने झाडे वाढवतील. जवळवाडीच्या भगिनी एकत्र येऊन सातत्यपूर्ण कामगिरी करीत ...

Curry leaves will be the new identity of Jawalwadi | कढीपत्ता ठरणार जवळवाडीची नवी ओळख

कढीपत्ता ठरणार जवळवाडीची नवी ओळख

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : स्त्रिया मुलांप्रमाणेच मायेने आणि प्रेमाने झाडे वाढवतील. जवळवाडीच्या भगिनी एकत्र येऊन सातत्यपूर्ण कामगिरी करीत आहेत. यामुळे आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून दिलेली कढीपत्त्याची झाडे अनेकींना स्थैर्य देईल. त्यामुळे कढीपत्त्याचे गाव म्हणून आपल्या गावाला एक नवी ओळख निर्माण होईल, असा विश्वास प्रा. संध्या चौगुले यांनी व्यक्त केला.

जवळवाडी ता. जावली ग्रामपंचायतीच्या वतीने वटपौर्णिमेच्या निमित्ताने गावातील अकाली वैधत्व आलेल्या व इतर महिलांना आर्थिक स्त्रोत निर्माण व्हावा यासाठी कढीपत्त्याच्या रोपांचे वाटप सामाजिक कार्यकर्त्या प्रा. संध्या चौगुले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना जवळवाडी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांचे कौतुक करून कढीपत्त्याच्या लागवडीमुळे जवळवाडी गावाला एक नवी ओळख निर्माण व्हावी, असा विश्वास प्रा. चौगुले यांनी व्यक्त केला.

जवळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून गेली तीन वर्ष अभिनव पद्धतीने वटपौर्णिमा साजरी केली जात असून, पहिल्या वर्षी अर्ध्यावर साथ सोडून गेलेल्या पतीच्या स्मृतिप्रीत्यर्थ वृक्षारोपण तर दुसऱ्या वर्षी दोनशे शेवग्याच्या रोपांचे वाटप करण्यात आले होते. यावर्षी जवळवाडीकरांनी ५०० झाडे लावण्याचा संकल्प केला असून आज वृक्षारोपण करून व रोपांचे वाटप करून याची सुरुवात करण्यात आली आहे.

सरपंच वर्षा जवळ यांनी या वेळी ग्रामपंचायतीच्या उपक्रमांची माहिती देताना सांगितले, अनोखी वटपौर्णिमा, संक्रात, विधायक ३१ डिसेंबर, निसर्गाशी जोडून घेणारी शिवार फेरी व रक्षाबंधन, कोरोनाकाळात गरीब -गरजूंना मदत, अशा विविध उपक्रमांसाठी महिला, ग्रामस्थ व युवक यांची मिळत असलेली मोलाची साथ आणि ज्येष्ठांचे मार्गदर्शन यामुळेच ग्रामपंचायतीचे कार्य प्रगतिपथावर असून वृक्षलागवड चळवळही आम्ही यशस्वी करू.

या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या गीता लोखंडे, शालिनी जवळ, राजश्री पाटील, आण्णासाहेब धनावडे, सुरेशबुवा जवळ, सर्जेराव जवळ, विठ्ठल पाटील, बबन जवळ, ज्ञानदेव जवळ व ग्रामस्थ, महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

Web Title: Curry leaves will be the new identity of Jawalwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.