जैविक खताद्वारे माळरानावर सीताफळ बाग फुलवत मिळवले भरघोस उत्पादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:32 PM2019-01-04T12:32:00+5:302019-01-04T12:32:52+5:30

यशकथा : सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत.

custard apple farming boosted on unused land by organic manure | जैविक खताद्वारे माळरानावर सीताफळ बाग फुलवत मिळवले भरघोस उत्पादन

जैविक खताद्वारे माळरानावर सीताफळ बाग फुलवत मिळवले भरघोस उत्पादन

googlenewsNext

- संतोष धुमाळ ( सातारा) 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील शेतकरी शेतात वेगवेगळे प्रयोग करीत आहेत. याचेच एक उदाहरण म्हणजे सोनके येथील प्रयोगशील शेतकरी भिकू धुमाळ. त्यांनी आपल्या माळरानावर जैविक खताचा वापर करून सीताफळाची बाग फुलविली आहे. तसेच यामध्ये घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. 

अलीकडील काळात पावसाची अनिश्चितता वाढली आहे. त्यातच दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे हाल होत असून, शेतकीचे अर्थशास्त्र बिघडले आहे. तोट्यातील शेती, मजुरांचा तुटवडा, पिकांवरील रोगराई आदी कारणांमुळे शेती क्षेत्रात गंभीर परिणाम होत आहेत. मुंबई येथील नोकरीतून सेवानिवृत्ती घेऊन सातारा जिल्ह्यातील भिकू धुमाळ यांनी आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करण्यास सुरुवात केली. जून २०१६ मध्ये त्यांनी वाठार स्टेशनचे कृषी सहायक तानाजी काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या फळ पीक लागवड योजनेंतर्गत आपल्या ६० गुंठे क्षेत्रावर बाळानगरी या जातीच्या जवळपास २०० झाडांचे नियोजन केले. यात ५, ७, ५ मीटर अंतरावर खड्डे काढून त्यात शेण व जैविक खतांचा भरणा केला. तत्पूर्वी त्यांनी बागेसाठी लागणाऱ्या पाण्यासाठी शेतात कूपनलिका खोदली. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी ठिबक सिंचनाची सोय करून सीताफळाची लागवड केली.

ही बाग पूर्णत: जैविक खतांवर जोपासण्याचा त्यांनी संकल्प केला. यासाठी लागवडीनंतर जीवामृत व इतर जैविक खते त्यांनी स्वत:च शेतात बनविली. यामुळे त्यांचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाचला. लागवडीनंतर एक ते दीड वर्षाच्या कालावधीनंतर झाडांची छाटणी करून घेतली. 

झाडे लावल्यापासून आजपर्यंत त्यांनी या क्षेत्रातून घेवडा, वाटाणा, पावटा यासारख्या आंतरपिकातून भरघोस उत्पादन मिळवले आहे. गतवर्षीच्या हंगामात पहिलाच बहर असल्याने अपेक्षित उत्पादन मिळाले नसले तरी चांगल्या दरामुळे इतर पिकांच्या तुलनेत सीताफळ पीक अधिक फायद्याचे ठरले. शाश्वत उत्पादन व आजाराला बळी न पडणारे फळपीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सीताफळाची सध्या परिसरात लागवड होत असून, डाळिंब व द्राक्षबाग पिकविणारा भाग आता सीताफळ उत्पादनातही आपली ओळख निर्माण करीत आहे. 

इतर फळबागांच्या तुलनेत सीताफळाचा भांडवली खर्च कमी आहे. सीताफळ हे कोणत्याही रोगाला बळी पडत नसल्याने त्यावर औषधाचा खर्चदेखील अगदीच नगण्य असतो. याउलट ऐन हंगामात देखील सीताफळाला किमान बाजारभाव ७० ते १५० रुपये प्रति किलो असा मिळतो. अल्पावधीतच आपली चव खवय्यांच्या जिभेवर दीर्घकाळ टिकविणाऱ्या या फळाला नागरिकांकडून मागणी वाढली आहे. रबडी, आइस्क्रीमसारख्या पदार्थांमध्ये सीताफळाचा वापर होत असल्याने सीताफळाची मागणी वाढल्याची माहिती शेतकरी भिकू धुमाळ यांनी दिली.

Web Title: custard apple farming boosted on unused land by organic manure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.