चायनीज कूक बनला सायबर गुन्हेगार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:51 AM2017-10-13T00:51:10+5:302017-10-13T00:51:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सेवानिवृृत्त महिलेला बँकेतून बोलत असल्याचे मोबाईलवरून सांगून एटीएमचा पासवर्ड घेऊन ५० हजारांची रोकड हातोहात लांबविणाºया युसूफ साहेबजान अन्सारी (रा. बगरुडिह, ता. करमाटांड, जि. जामतारा, झारखंड) याला पोलिसांच्या सायबर शाखेने अटक केली. विशेष म्हणजे पुण्याच्या चायनीज गाड्यावर आचाºयाचे काम करणाºया या युसूफची टोळी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासात त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तविली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शहरातील एका वृद्ध महिलेस २ आॅगस्ट रोजी एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. त्या व्यक्तीने स्टेट बँक आॅफ इंडियामधून बोलत असून, बँक खाते बंद करण्यात आले आहे. ते सुरू करण्यासाठी आधार कार्ड व तुमचे एटीएम कार्डचा नंबर सांगा, असे त्याने सांगितले. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून संबंधित वृद्धेने सर्व माहिती दिली.
त्यानंतर काही वेळांतच त्यांच्या बँकेच्या खात्यातून तब्बल ४९ हजार ९०० रुपये काढण्यात आले. हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक जी. एस. कदम यांच्या पथकाने तपास सुरू केला. युसूफ अन्सारीला अटक केली. त्याच्या अन्य साथीदारांसमवेत त्याने ही फसवणूक केल्याचे पोलिसांना सांगितले आहे. मात्र, अद्यापही त्याचे साथीदार पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
या कारवाईमध्ये सायबर सेलचे महेश शेटे, शंकर सावंत, सचिन पवार, विक्रांत फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, वर्षा खोचे यांचा समावेश आहे.
तिप्पट पगाराच्या आमिषाने आला
युसूफ हा पुण्यातील काळे नामक मराठी माणसाच्या चायनीज गाड्यावर आचारी म्हणून काम करत होता. फसवणूक झालेल्या महिलेच्या खात्यातील रक्कम ‘पेटीएम’ या अॅप्लिकेशनद्वारे युसूफने काळे याच्या खात्यात जमा केली. युसूफचा पत्ता झारखंडचा असल्याने त्याला पुण्यात स्वत:चे खाते उघडता आले नव्हते. त्यामुळे घरी पैसे पाठविण्यासाठी काळे यानेच पूर्वी स्वत:चे बँक खाते एटीएम कार्डसह युसूफला वापरायला दिले होते. ज्या खात्यात ५० हजार जमा झाले, त्याच्या पत्त्यावरून पोलिसांनी काळेला ताब्यात घेतले. या घटनेनंतर सहकाºयांसह युसूफ झारखंडला गेल्याचे काळे याने सांगितले. पोलिसांनी काळेलाच मोबाईलवर युसूफशी संपर्क साधण्यास सांगितले. पुण्यात दोन नवीन मोठे चायनीज हॉटेल सुरू करीत असून, त्यासाठी तिप्पट पगाराची नोकरी देण्यास तयार आहे, असे आमिष काळे याने दाखविताच युसूफ दोन-चार दिवसांतच पुण्यात आला अन् पोलिसांनी त्याला पकडले.