तौक्ते चक्रीवादळामुळे २९२ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:28 AM2021-06-03T04:28:07+5:302021-06-03T04:28:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये २९२ शेतकऱ्यांना ...

Cyclone hits 292 farmers | तौक्ते चक्रीवादळामुळे २९२ शेतकऱ्यांना फटका

तौक्ते चक्रीवादळामुळे २९२ शेतकऱ्यांना फटका

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात १५ दिवसांपूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळातील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून यामध्ये २९२ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. तर नुकसानग्रस्तांत फळबागधारकांचा अधिक समावेश आहे. या चक्रीवादळामुळे शेतकऱ्यांचे जवळपास पावणेदहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

जिल्ह्यात मे महिन्याच्या मध्यावर तौक्ते चक्रीवादळ आले होते. तीन दिवस वारा वाहत होता. तसेच पाऊसही झाला. यामध्ये सातारा, खटाव, माण, जावळी हे वगळता इतर ७ तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात नुकसान झाले. जिल्ह्यातील ५८.२५ हेक्टर क्षेत्राला वादळाचा फटका बसला. यामध्ये २९२ शेतकरी बाधित झाले आहेत. तर ९ लाख ७३ हजार ७५५ रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

तौक्ते चक्रीवादळात पाटण तालुक्यात अधिक प्रमाणात नुकसान झाले आहे. २८ हेक्टर क्षेत्राला फटका बसला. तर १४५ शेतकरी बाधित झाले आहेत. यामधील १४२ शेतकऱ्यांच्या फळबागांचे नुकसान झालेले आहे. तर तालुक्यात ५ लाखांहून अधिक रुपयांच्या उत्पन्नावर पाणी पडले आहे. महाबळेश्वर तालुक्यातही ५६ शेतकरी बाधित झाले असून सव्वाचार हेक्टर क्षेत्राला हानी पोहोचली. या तालुक्यात बागायत पिकांचे नुकसान झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातील ४२ शेतकऱ्यांना फटका बसला. बागायत पीकधारक १६ आणि फळबागा असणाऱ्या २६ शेतकऱ्यांचे मिळून १ लाख ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बाधित क्षेत्र साडेसहा हेक्टरजवळ आहे.

कोरेगाव तालुक्यात २ शेतकऱ्यांचे ९ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वाई तालुक्यातील ४५ शेतकऱ्यांचे २४ हजार रुपयांचे नुकसान झाले असून, बाधित क्षेत्र १६ हेक्टरवर आहे. खंडाळा आणि तालुक्यात प्रत्येकी एका शेतकऱ्याला फटका बसला. फलटणमध्ये फळबागेचे ४३ हजार रुपयांचे नुकसान झाले.

चौकट :

४१ हेक्टरवरील फळबागांना फटका...

तौक्ते चक्रीवादळाचा बागायत पिकाखालील १०३ शेतकऱ्यांना फटका बसला. यामध्ये १६.६१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तर २ लाख २४ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर फळपिकाखालील १८९ शेतकऱ्यांना वादळाची हानी पोहोचली. ४१.६१ हेक्टर क्षेत्र बाधित झाले. तर साडेसात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

..........................................................

Web Title: Cyclone hits 292 farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.