पाचगणीला तौक्ते चक्रीवादळाचा फटका; झाडे उन्मळून पडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:38 AM2021-05-17T04:38:01+5:302021-05-17T04:38:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने पाचगणी परिसरात पाऊस पडला तसेच जोरदार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पाचगणी : अरबी समुद्रात तयार झालेल्या तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने पाचगणी परिसरात पाऊस पडला तसेच जोरदार वारे वाहत होते. यामुळे शॉपिंग सेंटर मुख्य रस्त्यावर सिल्व्हर ओक झाड विजेच्या तारांवर पडले. यामुळे विद्युत पुरवठा खंडित बनला होता. त्याचबरोबर बोचरी थंडी वाजत आहे. त्यामुळे चक्क उन्हाळी मे महिन्यात जून महिना सुरू असल्याचे वातावरण तयार झाले आहे.
निसर्गातल्या बदलत्या लहरी हवामानामुळे गेल्या दोन वर्षांपासून चक्रीवादळे तयार होत आहेत. त्याचधर्तीवर आता मे महिन्यात अरबी समुद्रात तौक्ते नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. त्याच्या प्रभावामुळे सध्या पश्चिम महाराष्ट्र किनारपट्टीवर जोरदार वारे वाहून पाऊस पडत आहे. त्यामुळेच पाचगणी परिसरात जोरदार वारे वाहून सरासरीने पाऊस बरसत आहे. बोचरी थंडी वाजत असल्याने सर्वत्र शुकशुकाट निर्माण झाला आहे.
जोरदार वाऱ्यामुळे पाचगणी शहर परिसरात काही ठिकाणी झाडे पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला. वीज वितरण अधिकाऱ्यांनी याची अगाऊ सूचना अगोदरच वीज ग्राहकांना दिली आहे. अगोदरच लॉकडाऊन असल्याने सर्व लोक घरातच बसून आहेत. त्यात वीज नसल्याने टीव्ही पाहता येत नसल्याने लोकांचा हिरमोड झाला. तसेच बाहेरील वातावरणात पावसाळा चालू असल्याचा भास होत होता..!
पाचगणी येथील शॉपिंग सेंटरजवळ सिल्व्हर ओक झाड उन्मळून पडले.