‘कृष्णा’काठची ‘दादा’गिरी; कोण कुणाला पडणार भारी!

By admin | Published: June 16, 2015 10:00 PM2015-06-16T22:00:49+5:302015-06-17T00:37:44+5:30

उलटसुलट चर्चांना उत : पॅनेलच्या विजयासाठी नेत्यांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा

'Dada' girigi of 'Krishna'; Who's going to be heavy! | ‘कृष्णा’काठची ‘दादा’गिरी; कोण कुणाला पडणार भारी!

‘कृष्णा’काठची ‘दादा’गिरी; कोण कुणाला पडणार भारी!

Next

प्रमोद सुकरे - कऱ्हाड  --यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २१ जून रोजी होत आहे. निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कृष्णाकाठावर राजकीय दादागिरी पहायला मिळतेय; पण यातील कोण कोणाला भारी पडणार याचीच चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.‘कृष्णा’ कारखाना म्हटलं की, यशवंतराव मोहिते (भाऊ), जयवंतराव भोसले (आप्पा) यांचं नाव पुढं येतं, राम - लक्ष्मणाची जोडी म्हणून या दोघा भावांना ओळखलं जायचं; पणं सन १९८७ च्या दरम्यान या जोडीला दृष्ट लागली अन पुढे काय रामायण घडलं, ते साऱ्या महाराष्ट्राला माहिती आहे.सन १९८३ च्या कारखाना निवडणूकीत भाऊं चे रयत पॅनेल अन् आप्पांचे सहकार पॅनेल समोरासमोर उभी ठाकली, कारखान्यात पहिले सत्तांतर झाले अन् भाऊंचे पुतणे मदनराव मोहिते ‘दादा’ झाले. कारखान्याचे अध्यक्ष बनले. १० वर्षे त्यांनी अध्यक्षपद सांभाळले. त्यावेळपासून कारखान्याच्याच काय पण तालुक्याच्या राजकारणात दादांचा दबदबा पहायला मिळतो. तो नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीतही पहायला मिळाला.
कारखान्याच्या गत निवडणूकीत मोहिते - भोसलेंचे मनोमिलन होते. एक ‘दादा’ अन् तीन ‘बाबा’ एकत्र असूनही ‘रयत - सहकार’ पॅनेलचा पराभव झाला. संस्थापक पॅनेलने विजयाचा ‘नारळ’ फोडला. अन् अविनाश मोहितेंच्या रूपाने आणखी एका ‘दादा’ नेतृत्वाचा उदय झाला. सध्या या दोन्ही दादांच्या नेतृत्वाखाली कारखाना निवडणूकीत पॅनेल उभी आहेत.
‘कृ ष्णे’च्या निवडणूकीत वडगाव हवेली गावाची भूमिका नेहमीच महत्वाची मानली जाते. दिवंगत माजी मंत्री दादासाहेब जगताप यांचे गाव म्हणून या गावची ओळख आहे. सध्या त्यांचे राजकीय वारसदार म्हणून जगदीश जगताप (दादा) म्हणून ओळखले जातात. वडगावसह परिसरात त्यांचा राजकीय दबदबा आहे. ‘कृष्णे’ च्या निवडणूकीत ते यंदा भोसलेंच्या सहकार पॅनेलमधून उभे आहे. त्यांच्या जोडीला दुशेरेचे धोंडिराम जाधव (दादा) ही रिंगणात आहेत. जाधव हे पंचायत समितीतील विरोधी पक्षनेते म्हणून कार्यकरत आहेत. या दोन दादांचाही संपर्क मोठा आहे.
एकंदरीत काय मदनराव मोहितेंनी रयत पॅनेलसाठी, अविनाश मोहितेंनी संस्थापक पॅनेलसाठी तर जगदीश जगताप, धोंडिराम जाधव यांनी सहकार पॅनेलच्या विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा चालविली आहे. पण या राजकीय दादागिरीत कोण कुणाला भारी पडणार याची उलट - सुलट चर्चा सुरू आहे.

Web Title: 'Dada' girigi of 'Krishna'; Who's going to be heavy!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.