कोरोनाचा कहर वाढत असल्याने दहिवडी तीन दिवस बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:49 AM2021-02-20T05:49:58+5:302021-02-20T05:49:58+5:30
दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २०, २१ व ...
दहिवडी : दहिवडी शहरात कोरोनाचा वाढता कहर पाहून प्रशासन खडबडून जागे झाले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी २०, २१ व २२ फेब्रुवारी रोजी संपूर्ण शहर बंद ठेवण्याचा निर्णय नगरपंचायत प्रशासनाने घेतला आहे.
मागील काही दिवसांत शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे. त्यातच एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन तसेच तालुका प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या आजअखेर ४१२ इतकी झाली आहे. त्यापैकी ३३८ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या ६५ रुग्ण उपचार घेत आहेत, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
नगरपंचायत प्रशासनाने पोलिसांच्या सहकार्याने वारंवार कडक भूमिका घेत नियम मोडणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वाधिक ५ लाख ६० हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
प्रशासनाने कारवाया केल्या तरी नागरिकांचा निष्काळजीपणा व नियम मोडण्याची वृत्ती कमी होताना दिसत नाही. त्याचाच दुष्परिणाम म्हणून मागील काही दिवसांत शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी शुक्रवारी विविध विभागांच्या बैठका घेतल्या. नगराध्यक्ष जाधव यांनी आज व्यापारी, अंगणवाडी कर्मचारी, आशा सेविका यांच्या बैठका घेतल्या. अंगणवाडी कर्मचारी व आशा सेविका यांना संपूर्ण शहराचा सर्व्हे करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व व्यापाऱ्यांनी चाचणी करून घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
बैठकीस नगराध्यक्ष धनाजी जाधव, मुख्याधिकारी अवधूत कुंभार, तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ. लक्ष्मण कोडलकर उपस्थित होते.
फोटो १९दहिवडी-बठक
दहिवडी पंचायत समिती बचत भवनात शुक्रवारी आयोजित व्यापाऱ्यांच्या बैठकीत नगराध्यक्ष धनाजी जाधव यांनी प्रशासनाला काही उपाययोजना सुचविल्या. (छाया : नवनाथ जगदाळे)