दहिवडीचा केशर आंबा लंडनच्या बाजारपेठेत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:40 AM2021-05-07T04:40:43+5:302021-05-07T04:40:43+5:30
दहिवडी : कुसळेच उगवत होती अशा ठिकाणी दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनील पोळ यांनी त्यांच्या शेतात पाच वर्षांपूर्वी ...
दहिवडी : कुसळेच उगवत होती अशा ठिकाणी दहिवडी येथील सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन सुनील पोळ यांनी त्यांच्या शेतात पाच वर्षांपूर्वी आंब्याची सातशे झाडे लावली. ‘केशर’बरोबरच ‘बदामी’ व ‘राजापुरी’ आंब्याच्या झाडांची लागवडही त्यांनी केली आहे. एप्रिलमध्ये त्यांनी तीन टन आंबे लंडनला पाठविले.
सुनील पोळ हे दोन वर्षे आंब्याचे उत्पन्न घेत आहेत. आंब्याच्या झाडाला ते कोणत्याही प्रकारची रासायनिक फवारणी करीत नाहीत. या वर्षीही त्यांनी बाग सेंद्रिय पद्धतीनेच जोपासली आहे. कोकणातील हापूस आंबा बागायतदार यांच्या पद्धतीने वेळीच उपाययोजना केल्यामुळे या वर्षी केशर आंबा असतानाही लवकर फळ बाजारपेठेत आणण्यात ते यशस्वी झाले. केशर आंबा हा मे महिना अखेरीस व जूनमध्ये बाजारपेठेत येतो. कोकणातील हापूस लवकर आणण्याचे तंत्रज्ञान येथे उपयोगी पडले. उच्च दर्जाची आंब्याची प्रतवारी असल्यामुळे त्यांना बारामती येथील रेम्बो इंटरनॅशनल यांच्या मार्फत पणन मंडळाच्या पॅक हाउसद्वारे तीन टन केशर आंबा काही दिवसांपूर्वी निर्यात केला.
सर्व आंबे लंडनमधील रेडिंग शहरात गेले. या आंब्यांना दीडशे रुपये किलो प्रमाणे दर मिळाला. आंबा बाग अडीच एकरात आहे. दुष्काळी माण तालुक्यात पाण्याचे कायमच दुर्भिक्ष असते. परंतु दोन वर्षे चांगला पाऊस झाल्याने पाण्याची परिस्थिती चांगली आहे. तरीही उपाययोजना म्हणून शेततळे घेतले आहे. त्यातून ठिबक सिंचन पद्धतीने आंबा बागेला पाणी दिले जाते. त्यामुळे पाण्याची बचत होते. फक्त मुळांनाच पाणी दिले जाते. दुष्काळी माणमध्ये पूर्वी डाळिंब पिकाने क्रांती केली होती. यापुढील काळात आंबा पीकदेखील क्रांती करेल. एक हजार नवीन आंबा झाडे लावणार असल्याचेही सुनील पोळ यांनी सांगितले. त्यांना चिरंजीव यशही मदत करीत असतो. माण व दुष्काळ हे समीकरण कायम असताना माणमधील शेतकरी जिद्दीने शेतात वेगवेगळे प्रयोग करीत असतात. कांदा, डाळिंब, सीताफळ, द्राक्ष यांसारखी रोख पिके घेऊन पैसे कमावत असतात. निसर्गाची अवकृपा असल्याने शेतकरी वारंवार अडचणीत येत असतात; तरीही जिद्दीने पुन्हा उभे राहतात. हेच माणदेशी माणसाचे वैशिष्ट्य आहे. प्रतिकूल परिस्थितीत जगत निसर्गावर मात करत येथील शेतकरी वेगवेगळे प्रयोग धाडसाने करताना दिसत आहे.
फोटो ०६दहिवडी-मँगो
दहिवडी येथील सुनील पोळ यांनी पिकविलेल्या याच बागेतील आंबे लंडनला निर्यात केले आहेत. (छाया : नवनाथ)