दहिवडीचा आठवडा बाजार म्हणजे यात्राच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:39 AM2021-02-10T04:39:30+5:302021-02-10T04:39:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क दहिवडी : माण तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून दहिवडीच्या आठवडा बाजाराची ओळख आहे. दर सोमवारी भरणाऱ्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
दहिवडी : माण तालुक्यातील सर्वात मोठा बाजार म्हणून दहिवडीच्या आठवडा बाजाराची ओळख आहे. दर सोमवारी भरणाऱ्या या बाजारामुळे दहिवडीला अक्षरश: यात्रेचे स्वरूप येते. या बाजारामुळे शहरातील प्रमुख रस्तेच नव्हे तर गल्लीबोळातून प्रवास करणेही जिकिरीचे बनते. अनेक समस्या येऊनही प्रशासनाने आठवडा बाजार एकाच छताखाली आणण्याचे अद्याप कोणतेही नियोजन केलेले नाही.
दहिवडीतील मध्यवर्ती ठिकाणी आठवडी बाजाराची जागा आहे. या ठिकाणी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे शहराला जोडणारे चारही बाजूचे रस्ते विक्रेत्यांनी तुडुंब भरलेले असतात. बाजारात खरेदीसाठी येणारे ग्राहकदेखील कोणतीही शिस्त न पाहता जागा दिसेल तेथे गाड्या लावतात. त्यामुळे चहूकडे वाहतुकीची कोंडी होते. या शिवाय सर्वच गल्लीबोळात जिथे जागा सापडेल तेथे शेतकरी आपला भाजीपाला विकण्यासाठी बसतात. दुसरीकडे धान्य बाजाराचीही अशीच अवस्था आहे.
लॉकडाऊनच्या काळात आठवडा बाजार हा बाजार समितीच्या मोकळ्या मैदानावर भरत होता. मात्र त्यानंतर पुन्हा दहिवडी शहरात भरू लागला. रस्त्यावरील या आठवडा बाजारामुळे शहरात तब्बल अर्धा किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.
(चौकट)
या ठिकाणी होऊ शकते व्यवस्था
दहिवडी शहराला मोकळा श्वास घ्यायचा असेल तर बाजार समितीसमोर जवळपास पाच एकरापेक्षा मोठे मैदान आहे. या ठिकाणी वाहने पार्क करण्यासाठीही मोठी जागा आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत आठवडा बाजार या जागेवर भरत होता. त्यामुळे आठवडा बाजारासाठी प्रशासनापुढे या जागेचा पर्याय उपलब्ध आहे.
(चौकट)
..म्हणे ग्राहकच येत नाहीत
बाजार समितीची जागा मध्यवर्ती ठिकाणापासून थोड्या अंतरावर आहे. या ठिकाणी बाजार भरविल्यास ग्राहक या बाजाराकडे पाठ फिरवितात. त्यामुळे आठवडा बाजार व दैनंदिन मंडई बाजार समितीच्या मैदानात भरविल्यास ग्राहकांची संख्या कमी होते, यामुळे बाजार समितीच्या मैदानापेक्षा रस्ताच बरा, अशी धारणा शेतकऱ्यांची झाली आहे.
फोटो : ०९ दहिवडी
दहिवडी येथे दर सोमवारी भरणाऱ्या आठवडा बाजारामुळे वाहतूक कोंडीची समस्या अत्यंत गंभीर होते.
लोगो : रस्त्यावरचा आठवडा बाजार - ६