दहिवडी आगाराचे ढिसाळ नियोजन, एसटी बस वेळेत न सुटल्याने विद्यार्थ्यांची अंधारातून पायपीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 12:39 PM2017-12-02T12:39:26+5:302017-12-02T12:45:02+5:30
दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एसटी वेळेत सोडण्याची मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.
पळशी (सातारा) : दहिवडी आगारातून सायंकाळी साडेपाच वाजता सुटणारी दहिवडी-पळशी एसटी आगाराच्या ढिसाळ नियोजनामुळे वेळेत सुटत नाही. त्यामुळे ही बस पळशी गावात सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास पोहोचत आहे. बस वेळेवर येत नसल्याने मुलींच्या पालकांच्या जीवाला घोर लागत असून, एसटी वेळेत सोडण्याची मागणी पालक व ग्रामस्थांतून होत आहे.
पळशी तसेच वाड्यावस्त्यांवरून दहिवडी येथे महाविद्यालयीन शिक्षणासाठी अनेक विद्यार्थी जातात. गोंदवले, लोधवडे, पळशी येथील विद्यार्थ्यांच्या सततच्या होणा ऱ्यां वादावादीमुळे दहिवडी-पळशी एसटीची वेळ काही महिन्यांपूर्वी एक तास वाढवून सायंकाळी साडेपाच अशी करण्यात आली.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने परिवहन विभागाकडून उपाययोजना करण्यात आली असली तरी दुसरीकडे मात्र बस वेळेवर सोडली जात नसल्याने प्रवासी व विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.
सायंकाळी साडेपाच अशी वेळ असताना दहिवडी-पळशी बस कधी सहा तर कधी साडेसहा वाजता बसस्थानकातून मार्गस्थ होते. गावात बस उशिरा पोहोचल्याने पळशीसह वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्या मुला-मुलींना अंधारात वाट शोधत घरी जावे लागत आहे. आगार प्रमुखांनी विद्यार्थ्यांना येणाºया अडचणींची गांभीर्याने दखल घेऊन दहिवडी-पळशी बस वेळेत सोडावी, अशी मागणी होत आहे.
दहिवडी-पळशी एसटी गावात वेळेत पोहोचत नाही. विद्यार्थ्यांना घरी अंधारतच चालत जावे लागत आहे. एसटी वेळेत सोडण्याबाबत आगार प्रमुखांना वेळोवेळी फोन केले आहेत. मात्र, अद्याप दखल घेतली नसून परिवहन मंत्र्यांना भेटून निवेदन देणार आहे.
- विष्णू खाडे
तालुका उपाध्यक्ष, भाजप
साडेपाचची वेळ असलेली एसटी कधी सहा तर कधी साडेसहाला सुटत असते. त्यामुळे गावात येईपर्यंत पूर्ण अंधार झालेला असतो. बस वेळेत सोडली तर आम्ही लवकर घरी पोहोचू .
- विशाल नाकाडे
विद्यार्थी, पळशी