Maratha Reservation: आरक्षण दिल्याशिवाय पेपर नाही, साताऱ्यातील दहिवडीत विद्यार्थ्यांचा परीक्षेवर बहिष्कार
By दीपक शिंदे | Published: October 31, 2023 01:53 PM2023-10-31T13:53:18+5:302023-10-31T14:05:38+5:30
तोपर्यंत शाळेत जाणार नसल्याचा घेतला निर्णय
दहिवडी : दहिवडी (ता. माण) येथील महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. ३१) परीक्षेवर बहिष्कार टाकत जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शाळेत जाणार नाही, असा निर्णय घेतला.
मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे शाळा भरेल, असे वाटत असतानाच अचानक सर्व मुले महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ जमली. क्षणभर काही कळायच्या आतच घोषणा सुरू झाल्या. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, जय शिवाजी जय भवानी, आरक्षण नाही तोपर्यंत शाळा नाय, असा पवित्रा घेतला. त्यामुळे शाळेतील शिक्षकांचाही नाईलाज झाला. प्रवेशद्वाराजवळ शेकडो विद्यार्थी जमा झाले तसेच जरांगे-पाटील यांना पाठिंबा म्हणून आंदोलन केले.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून देताना आरक्षण नसेल तर शिकून तरी काय करायचे, आम्हाला सवलत नसल्याने, आमची ऐपत नसल्याने, उच्च शिक्षण घेता येणार नाही. त्यापेक्षा सरकारने आरक्षण द्यावे. दिले नाही तर पेपर पण नाही, शाळा पण नको, या भूमिकेशी आम्ही ठाम राहणार, असे सांगितले.