अंधार पडताच ‘आपोआप’ दिवेलागण!
By admin | Published: May 22, 2014 12:12 AM2014-05-22T00:12:38+5:302014-05-22T00:43:30+5:30
अत्याधुनिक तंत्रज्ञान : पोवई नाका-विसावा नाका रस्त्यावर लखलखाट
सातारा : पोवई नाका ते विसावा नाका या तीन कोटी रूपये खर्चाच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले असून, चकाचक झालेल्या या रस्त्यावर बसविण्यात आलेले अत्याधुनिक, स्वयंचलित पथदिवे सुरू झाल्याने हा रस्ता झगमगाटाने उजळून निघाला आहे. वाहनांच्या गर्दीने नेहमी गजबजणारा हा रस्ता आता रोषणाईने लखलखला आहे. रात्रीच्या वेळी नागरिकांसाठी रस्ता सुरक्षित झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. अंधार होताच आपोआप सुरू होणारे आणि उजेड पडताच बंद होणारे पथदिवे सातार्यात प्रथमच बसविण्यात आले आहेत. पोवई नाका ते विसावा नाका रस्ता दुपदरी होता. याच रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती बँक अशी शासकीय व सहकारी कार्यालये असल्याने; तसेच जिल्हा सत्र न्यायालय याच रस्त्यावर असल्याने जिल्हाभरातून येणार्या वाहनांची वाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात होते. रस्ता दुपदरी असल्याने येथे वारंवार वाहतुकीचा खोळंबा; तसेच लहान-मोठे अपघातही होत होते. या रस्त्याचे चौपदरी करण होऊन रस्ता रुंद करण्याची मागणी होती. याबाबत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सातत्याने पाठपुरावा करून अर्थसंकल्पीय कामांतर्गत या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी तीन कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. सातारा शहराचे प्रवेशद्वार असणार्या या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पूर्ण झाले आहे. बारामतीमधील रस्त्यांवर असणार्या अत्याधुनिक पथदिव्यांसारखे दिवे या मार्गावर बसविण्याच्या सूचना आमदार शिवेंद्रसिंहराजेंनी कार्यकारी अभियंता शरद राजभोज व सहायक कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे यांना केल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत उपविभागामार्फत या रस्त्यावर ऊन, वादळी वारा व पावसाचा सामना करणार्या तसेच गंजविरोधी आणि वीजबचत करणार्या पथदिव्यांची उभारणी करण्यात आली आहे. ४४ खांब व ८८ फिटिंगमध्ये बसविण्यात आलेल्या या दिव्यांसाठी ३ ठिकाणी ‘सेन्सिटिव्ह टायमर्स’ बसविण्यात आले आहेत. अंधार पडताच सुरू होणारे आणि उजेड होताच बंद होणार्या या दिव्यांसाठी स्वयंचलित यंत्रणा बसविण्यात आल्याने विजेची बचत होणार आहे. भव्य रस्त्यावर दुभाजक, पदपथ आणि पथदिवे या सुविधांची भर पडल्याने समाधान व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)