दिवसाढवळ्या जीवघेणे ‘ट्रीप सी’

By admin | Published: June 17, 2015 09:51 PM2015-06-17T21:51:57+5:302015-06-18T00:37:45+5:30

साताऱ्यातील चित्र : पोलीसदादांनी कडक कायद्याचा बडगा उगारण्याची मागणी

Daily Life 'Trip Sea' | दिवसाढवळ्या जीवघेणे ‘ट्रीप सी’

दिवसाढवळ्या जीवघेणे ‘ट्रीप सी’

Next

सातारा : नियम हा मोडायलाच असतो, अशा अविर्भावात अनेकजण राहतात. एका दुचाकीवर दोघांनी प्रवास करायचा नियम आहे; पण हा नियम धाब्यावर बसवून सातारा शहरातील मुख्य चौकांमध्ये दिवसाढवळ्या चक्क ‘ट्रीपल सीट’ रपेट मारणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या अतिधाडसी सातारकरांना वेळीच आवर घालणे आवश्यक बनले आहे. वरचा रस्ता, खालचा रस्ता आणि मधला रस्ता या तीन रस्त्यांमध्ये सातारा शहर संपते. शहरात दाटवस्ती असल्यामुळे रस्त्याच्या रुंदीकरणास मर्यादा येत आहेत. त्यामुळे दुपदरी रस्त्यावरूनच वाहनांची वर्दळ सुरू असते. मुख्यरस्ता सोडला तर बाजारपेठेत अनेक ठिकाणी रस्त्यावर बसणाऱ्या विक्रेत्यांची संख्याही लक्षणीय आहे.या रस्त्यावरून मार्ग काढणाऱ्या वाहनचालकांना आता ट्रीपल सीट जाणाऱ्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. दिवसाढवळ्या नियम मोडून सुरू असणारी ही वाहतूक सर्वांचीच डोकेदुखी ठरत आहे.
अनियंत्रित वेग आणि गाडीचा अंदाज येत नसल्यामुळे किरकोळ अपघातही वाढत आहेत. (प्रतिनिधी)


महिलाही आघाडीवर...!
सुरक्षिततेच्या बाबतीत महिला अधिक जागरूक असतात; पण वाहन चालविताना घ्यावयाच्या काळजीबाबत महिलांचे कमालीचे दुर्लक्ष होते. चार पैसे वाचविण्यासाठी महिलाही आता मोठ्या प्रमाणावर ट्रीपल सीट वाहन चालविताना दिसत आहेत. गल्लीबोळात आणि अंतर्गत छोट्या रस्त्यांतून ट्रीपल सीट वाहन चालविताना महिलांची कसरत होते. स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात टाकून हा प्रवास महिला करतात.


महाविद्यालयीन विद्यार्थी सुसाट
सातारा शहरात विविध महाविद्यालय परिसरात विद्यार्थी सुसाट गाड्या चालवतात. विशेष म्हणजे, ट्रीपल सीट असले तरीही या विद्यार्थ्यांच्या वाहनांचा वेग बेफाम असतो. या वाहनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वाहतूक पोलीस गस्त घालून विद्यार्थ्यांवर दंडात्मक कारवाई करतात; पण कधीतरीच होणाऱ्या या कारवाईची धास्ती विद्यार्थ्यांमध्ये राहिली नाही. महाविद्यालय प्रशासनही प्रांगणाच्या बाहेर होणाऱ्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत असल्यामुळे या विद्यार्थ्यांचे धाडस वाढले आहे, त्यामुळे अनुचित प्रकारांमध्ये वाढ होत आहे.


लंच ब्रेकचा फायदा
साताऱ्यातील अनेक पॉइंटवर नियोजित वेळेत वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित राहतात. त्यामुळे सकाळी साडेनऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत मुख्य रस्त्यांवर आणि चौकात कुठेच ट्रीपल सीट वाहने बघायला मिळत नाहीत; पण एकदा हे कर्मचारी जेवणाच्या सुटीला गेले की, मग त्यांच्या अनुपस्थितीत मुख्य चौकातूनही ट्रीपल सीट वाहने धावताना पाहायला मिळते. संध्याकाळी सात नंतरही असेच चित्र शहराच्या मुख्य रस्त्यावर दिसते.

Web Title: Daily Life 'Trip Sea'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.