रोज सव्वादोन कोटींचं पेट्रोल खपेना ! जिल्ह्यात रोज अडीच लाख लिटर पेट्रोलचा व्यवसाय बुडाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2018 01:26 AM2018-05-27T01:26:06+5:302018-05-27T01:26:06+5:30
जगदीश कोष्टी ।
सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत चालल्यामुळं बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी केलंय. जिल्ह्यातील २३० पेट्रोलपंप चालकांना याचा फटका बसला असून पंपांवर सरासरी एक लाखाची उलाढाल कमी झालीय. याचाच अर्थ जिल्ह्यातील पंपचालकांना रोज सुमारे २ कोटी ३० लाख रुपयांचा फटका बसू लागलाय.
देशभरात सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह््यातील दुचाकीस्वारांची शंभर तर चारचाकी चालकांची पाचशे रुपयांचे पेट्रोल भरण्याची पूर्वीपासूनच मानसिकता आहे. पूर्वी शंभर रुपयांचे पेट्रोल भरले तर १.२२ लिटर पेट्रोल येत होते. ते आता १.०६ लिटर मिळते. साधारणपणे चार दिवस पुरणारे पेट्रोल आता दोन दिवसांत संपत आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोलचा झटका बसायला लागला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच गाडीचा वापर केला जात आहे.
एरवी सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. त्या पंपावर केव्हातरी एखादी गाडी येत आहे. इतर वेळेस सर्व कामगार निवांत बसलेलेच पाहायला मिळतात.
सातारा शहरात आठ तर जिल्ह्यात २३० पेट्रोलपंप आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर दररोज कमीतकमी साडेतीन ते चार लाख तर शहरी भागात दहा ते बारा लाखांची उलाढाल होते. दरवाढीमुळे उलाढालीवर सरासरी तीस टक्क्याने घसरण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पंपचालकाचा सरासरी एक लाखाचा व्यवसाय बुडाला. जिल्ह्यातील २३० पंपांचा विचार केला तर हा आकडा २ कोटी ३० लाखांच्या घरात जातो. तसेच पेट्रोल पंपावर अवलंबून असलेल्या व्यावसायावरही परिणाम होत आहे. पंपावर हवा भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
स्वत:ची गाडी घरी ठेवून माझी गाडी घेऊन जाण्याची आता सवयच लागली आहे. मीही कोणाला न दुखवता चावी देत होतो; आता पेट्रोलचे दर वाढले असल्याने मीच गाडीचा वापर कमी करतो. पण आता कोण गाडी मागायला आला तर स्पष्ट सांगतो, ‘दहा रुपये घेऊन रिक्षाने जा; पण गाडी सोडून बोल.
- चेतन चवरे, सातारा.
मी कॉलेजला जाण्यासाठी, पाहुणे-मैत्रिणींकडे जाण्यासाठी गाडीचा वापर करत होते; पण दरवाढ होऊ लागली. त्यामुळे यापुढे एसटीनेच कॉलेज जात होते आता सुट्या असल्या तरी यापुढेही एसटीनेच जाण्याचा संकल्प केला आहे.
- जागृती साबळे, शिवथर
पेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. या बदलाला सामोरे जाता सुज्ञ ग्राहक व पंपचालकांनी अभ्यासपूर्वक सामोरे जाण्याची गरज आहे.
- रितेश रावखंडे, सचिव,
सातारा जिल्हा पेट्रोलियम डिलर्स, असोसिएशन, सातारा