गावोगावच्या शिवारात रोजचीच सापांची सळसळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 11:05 PM2019-08-04T23:05:21+5:302019-08-04T23:05:26+5:30
संजय पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कºहाड : नागपंचमीला वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नागाचे दर्शन व्हावे, ...
संजय पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कºहाड : नागपंचमीला वारुळाची पूजा करण्याची परंपरा आहे. या दिवशी नागाचे दर्शन व्हावे, अशी अनेकांची मनोमन इच्छा असते. अनेकवेळा ती पूर्ण होतेही. जिल्ह्यात पोषक अधिवास असल्याने येथे सर्पांच्या विविध जाती आढळून येतात. नागपंचमीलाच नव्हे तर एरव्हीही अनेकांना वारंवार सर्पांचे दर्शन होते. त्यातून येथील समृद्ध जैवविविधता अधोरेखित होते.
प्रत्येकाच्या मनात सर्पाविषयी जेवढी भीती आहे, तेवढीच उत्सुकताही. त्यामुळे अनेकजण भीतभीत का होईना साप पाहायला धावतात. जिल्ह्यामध्ये सर्पांच्या अनेक जाती आढळतात. त्यामधील काही सर्प विषारी तर काही बिनविषारी आहेत. साप सर्व प्रकारच्या अधिवासात आढळतात. गोड्या तसेच समुद्राच्या पाण्यात, गवताळ व खडकाळ प्रदेशात, दलदलीजवळ, अडगळीत सापांचे वास्तव्य असते. काही साप झाडावर राहतात. या सापांचे वास्तव्य फांद्यांवर, झुडपांत व झाडांच्या ढोलीत असते. त्यांची शेपटी लांब असल्याने वरच्या फांदीवरून खालच्या फांदीवर येताना ते वरच्या फांदीस वेटोळे टाकून आपल्या शरीराचा पूर्ण भार पेलू शकतात. नद्या, तळी व नाले यांच्या आसपास आढळणाऱ्या सापांना पाणसर्प म्हटले जाते.
त्यामध्ये विरोळा, पट्टेरी पाणसाप, पाणदिवड आदी सर्पांचा समावेश होता. या प्रकारचे सर्प जिल्ह्यात सर्वत्र पाणीसाठ्याच्या ठिकाणी आढळून येतात. साप कायम एकाच प्रकारच्या अधिवासात राहत नाहीत. पाणसर्प जमिनीवर किंवा जमिनीवरील साप पाण्यात आढळू शकतात. साप जमिनीवर बिळात राहतात; परंतु ते स्वत: बीळ तयार करीत नाहीत. मुंग्यांच्या वारुळात किंवा उंदीर व इतर प्राण्यांनी तयार केलेल्या बिळात ते राहतात. जिल्ह्याच्या पश्चिम भागात गर्द वनराईमध्ये अनेक दुर्मीळ प्रकारच्या सापांचे अस्तित्व आहे.
विषारी, बिनविषारी साप
सापाच्या विविध जातींपैकी ठराविक सर्प विषारी तर अनेक सर्प बिनविषारी आहेत. धामण, दिवंड, पाणदिवंड, गवत्या, शेवाळी, कुकरी, तस्कर, कवड्या, मांडूळ, डुरक्या हे सर्प बिनविषारी आहेत. तर घोणस, फुरसे, मण्यार, पोवळा, नाग हे साप विषारी आहेत.
सर्पांविषयीच्या गैरसमजुती
सर्पांविषयी अनेक गैरसमजुती आहेत. साप डूख धरतो, दूध पितो, हरणटोळी जातीचा साप डोक्यामध्येच दंश करतो, गर्भवती स्त्रीने सर्पाच्या डोळ्यात पाहू नये, नागांच्या डोक्यावर नागमणी असतो, रात्री शिट्टी वाजविल्यास साप घरामध्ये येतो.
प्रमुख सर्पांची वैशिष्ट्ये
धामण : हा सर्प बिनविषारी असून, तपकिरी, शेवाळी, पिवळा किंवा काळ्या रंगामध्ये ती आढळते. हा सर्प अतिशय चपळ असून, डिवचला गेल्यास शरीर फुगवून हल्ला करतो.
गवत्या : हिरव्या रंगाच्या या सर्पात खरखरीत खवले असतात. हा सर्प निशाचर आहे. तसेच तो बिनविषारी आहे. गवताळ किंवा पाणथळ जागेत तो हमखास आढळतो.
घोणस : हा सर्प विषारी असून, याच्या शरीरावर तपकिरी किंवा त्यावर पांढरी किनार असलेल्या गडद तपकिरी गोल ठिपक्यांच्या तीन रांगा असतात. डिवचला गेल्यास हल्ला करतो.
नाग : नाग विषारी असून तपकिरी, पिवळसर, राखाडी किंवा काळ्या रंगात तो आढळतो. फण्यामागे मोडी लिपीतील दहाचा आकडा असतो. वारूळ, पडक्या घरात वास्तव्य असते.