दरवाढीने स्वयंपाकघरात ‘डाळ शिजेना’!
By admin | Published: October 25, 2015 12:06 AM2015-10-25T00:06:12+5:302015-10-25T00:06:12+5:30
महागाईने वाजविले तीनतेरा : तूरडाळ सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; इतर कडधान्यांचा मोठ्या प्रमाणात वापर; तूरडाळीच्या पदार्थांचीही दरवाढ
सातारा : ऐन सणांच्या तोंडावर महिन्यापूर्वी ऐंशी रुपये किलो मिळणाऱ्या तूरडाळीचे दर गगनाला भिडले आहेत. सध्या तूरडाळ २२० रूपये किलोवर जाऊन पोहोचली आहे. डाळ दराच्या तडक्याने गृहिणींसह सर्वांच्याच डोळ्यात पाणी आणले आहे. दिवाळीच्या तोंडावर तूरडाळीचे भाव उतरतील, असे सरकार म्हणत असले तरी आयात केलेली डाळ ग्राहकांना १४० ते १५० रूपये किलो दरानेच मिळणार आहे. हा दरही सर्वसामान्यांना न परवडणारा असून यामुळे दर उतरल्याशिवाय स्वयंपाकघरात ‘डाळ काही शिजणार नाही’, असेच चित्र दिसत आहे.
तूरडाळ, मसूरडाळ, उडीदडाळ हरभऱ्याची डाळ, मूगडाळ या डाळी सर्वसामान्यांचे जेवणात दररोज दिसतात. पावसाअभावी भाजीपाल्याचे दर तेजीत असल्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात जेवणासाठी डाळींचाच जास्त प्रमाणात वापर केला जातो. अगदी पालेभाजी, फळभाजी करतानाही त्यामध्ये डाळ वापरली जाते. असे एकही घर शोधून सापडणार नाही, जिथे डाळ खाल्ली जात नसेल. एवढं सख्ख्य माणसाचं आणि डाळीचं जमलं आहे.
हॉटेल, खाणावळीत डाळींचा जास्त वापर होतो. ‘डाळ तडका’, ‘अख्खा मसूर’ ही डिश तर सर्वांचीच आवडती असते. मात्र दरवाढीमुळे सर्वत्रच डाळ वापराचे प्रमाण कमी झाले आहे. एकूणच माणसाच्या आयुष्यात डाळीचं असणारं महत्त्व आणि डाळीचे वाढते दर याविषयी ‘लोकमत’ने केलेल्या सर्व्हेत बहुतांशी कुटुंबातील स्वयंपाकघरातून तूरडाळ जवळजवळ दुरावली असून ती वापराचे प्रमाण २५ टक्के आहे. तर हॉटेल व्यावसायिकांनी डाळीच्या पदार्थांच्या किमती वाढविल्या असल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)
महागाईत जनता भरडली
भरमसाठ दरामुळे भाजीपाला खाण्याची तर काही सोय राहिली नाही आणि रोज भाजी विकत घेणंही खिशाला परवडत नाही. त्यापेक्षा किलोभर डाळ घेतली की महिनाभराचं काम भागत होतं. पण आता डाळीचेही भाव वधारले आहेत. आता डाळपाण्यावर दिवस काढण्याचे दिवसही आता राहिले नाहीत.
- दिनकर देगावकर, नागरिक, सातारा
मागील दोन महिन्यांपासून तूरडाळीचे भाव गगनाला भिडले आहेत. त्यामुळे डाळीऐवजी कडधान्याचा पर्याय निवडला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिकही तूरडाळीची भूक मूग, मसूर, घेवडा या डाळींवरच भागवितात. दर कमी झाल्याशिवाय तूरडाळ मुखात पडणार नाही. किलोभर लागणारी डाळ आता पावशेरच्या घरात आली आहे.
- अनुश्री रजपूत, गृहिणी
हॉटेल, खाणावळीत वांगी, बटाटा यासोबत डाळही लागते. मात्र आता डाळ महागल्यामुळे ‘डाळ तडका’ सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला परवडत नाही. त्यामुळे आता मिक्स वाटाणा भाजीच जास्त चालते.
- मोहनसिंग रजपूत, हॉटेलचालक