फलटणला आता फ्लेक्सनंतर डॉल्बी बंदी !
By Admin | Published: August 28, 2016 11:59 PM2016-08-28T23:59:53+5:302016-08-28T23:59:53+5:30
गणेशोत्सव बैठक : पोलिस अधीक्षकांकडून कौतुक; मंडळांनी पुढाकार घेण्याचे आवाहन
फलटण : ‘फलटण शहरात सर्वप्रथम फ्लेक्स बंदीचा कायदा आणण्यात आला. आता डॉल्बी बंदीचाही चांगला निर्णय घेऊन जिल्ह्यात फलटण आदर्श रोल मॉडेल बनविण्यासाठी आणि इतरांनी त्याचे अनुकरण करण्यासाठी सर्वच गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घ्यावा,’ असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले.
येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक भवनात आयोजित गणेशोत्सव मंडळ कार्यकर्ते बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार दीपक चव्हाण, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, पंचायत समिती सभापती वैशाली गावडे, नगराध्यक्षा सारिका जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश चोपडे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले, अजित दोशी, हिरालाल गांधी, डॉ. विक्रम पोटे, संपतराव कळंबे, शांताराम काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
फलटण जिल्ह्यासाठी रोल मॉडेल आहे. याठिकाणी राबविण्यात येणारी नियमावली ही बाराव्या शतकापासूनच्या परंपरेस अनुरूप आहे. फलटणचे अनुकरण जिल्हा करतो आम्ही, फलटणचे फ्लेक्स बंदीचे उदाहरण जिल्ह्यात देतो. तसेच उदाहरण डॉल्बीसंदर्भात ही देण्यासाठी सर्व मंडळांनी डॉल्बी बंदी करावी. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करावा, असे संदीप पाटील यांनी सांगितले
‘डॉल्बीमुक्त गणेशोत्सवाचे आयोजन करावे. कारण डॉल्बीचे दुष्परिणामच जास्त होतात. त्यामुळे तालुक्याचा ऐतिहासिक वारसा नष्ट होण्याची भीती आहे. क्षणिक करमणुकीसाठी या गोष्टी करायच्या का? याचा विचार करण्याची गरज आहे.
तरुणांनी डॉल्बीचा नाद सोडावा, पारंपरिक वाद्यामध्ये आपली संस्कृती आहे ती जपावी,’ असे आवाहन रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी केले.
यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (गजानन चौक फलटण), श्रीमंत सत्यजितराजे नाईक-निंबाळकर गणेश मंडळ (रामराजेनगर फलटण) आणि शिवछत्रपती युवक व क्रीडा मंडळ (कोळकी) या गणेश मंडळांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन फलटण शहर व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या वतीने पोलिस निरीक्षक प्रकाश धस, पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
यावेळी विविध मान्यवरांसह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिस उपनिरीक्षक मुंढे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)