कापड व्यावसायिकाच्या घरात कामगारानेच मारला डल्ला; आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
By दत्ता यादव | Published: May 27, 2024 07:57 PM2024-05-27T19:57:41+5:302024-05-27T19:57:54+5:30
अवघ्या १८ तासांत गुन्हा उघडकीस; आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
सातारा : शहरातील कापड व्यावसायिक राजकुमार उधानी यांच्या घरात त्यांच्याच दुकानात काम करत असलेल्या कामगाराने आठ लाख ८० हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. मात्र, अवघ्या १८ तासांत शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून कामगाराला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.
आदित्य सुभाष कापसे (वय १९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजकुमार उधानी (वय ५९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचे साताऱ्यात कापड दुकान आहे. या दुकानात आदित्य कापसे हा गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. दरम्यान, कास येथे दि. २५ रोजी दुपारी एका काैटुंबिक कार्यक्रमाला उधानी कुटुंबीय गेले होते. ही संधी साधून दुकानातील कामगार आदित्य याने रात्री साडेसात वाजता मुख्य दरवाजाचे कुलून तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला.
बेडरुममधील लाकडी कपाटातील ड्राॅव्हरमधून १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, ९६ हजारांची रोकड असा सुमारे आठ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ही चोरी दुकानातील कामगार आदित्य कापसे याने केल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्याने चाेरीची कबुली दिली. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले दागिने आणि पैसे त्याने पोलिसांना काढून दिले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे, अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत आदींनी या कारवाईत भाग घेतला.
म्हणे पगार कमी म्हणून केली चोरी...
आदित्य कापसे याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर त्याने पगार कमी असल्यामुळे मालकाच्या घरात चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, महिन्याला त्याला दहा हजार रुपये पगार होता, असे पोलिसांनी सांगितले.