धरण उशाला; पण कोरड पडणार घशाला!
By admin | Published: November 2, 2014 09:05 PM2014-11-02T21:05:11+5:302014-11-02T23:32:21+5:30
वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा रिकामा : पाणीसाठ्याने गाठला तळ, भीषण टंचाई जाणवण्याची शक्यता
सणबूर : वांग-मराठवाडी धरणाचा दरवाजा पूर्णपणे उघडा आहे. त्यामुळे जलाशयातील पाणी पातळीने तळ गाठण्यास सुरुवात केली असून, काही दिवसांतच विभागाला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत. धरणाचे दरवाजे बंद करून पाणीसाठा करण्यात यावा, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करीत आहेत़
युती शासनाच्या काळात १९९७ मध्ये वांग-मराठवाडी धरणाच्या कामाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते करण्यात आले़ ‘आधी पुनर्वसन मग धरण’ असे धोरण युती शासनाने राबविले.
त्यामुळे रेठरेकरवाडी, यादववाडी या गावांचे पुनर्वसन त्यावेळी योग्य पद्धतीने झाले़ पुढे १९९९ मध्ये युती शासनाला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आणि काँग्रेस-राष्ट्रवादीने महाराष्ट्राच्या सत्तेच्या चाव्या आपल्या हाती घेतल्या़ त्यानंतर धरणाच्या कामांना कधी गती प्राप्त झालीच नाही़ गत दोन वर्षांपूर्वी घळभरणीचे काम पूर्ण करून धरण व्यवस्थापनाने वांग-मराठवाडी जलाशयात ०़६० टीएमसी एवढा पाणीसाठा करण्यास सुरुवात केली होती़
मात्र, त्यानंतर वांग-मराठवाडी कृती समितीने सलग सात दिवस मोठे आंदोलन करून शासनाला धरणाचे पाणी सोडून देण्यास भाग पाडले़
धरणग्रस्तांनी केलेले आंदोलन योग्यच होते, कारण त्यांच्या त्यागातूनच लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांचे संसार फुलणार होते. मात्र, ज्या लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनीला चार एकराचे स्लॅब लावून जमिनी काढून घेतल्या, त्या शेतकऱ्यांना गेली पंधरा वर्षांपासून पाणी मिळत नसेल तर त्या धरणाचा उपयोग काय ? असा सूर लाभक्षेत्रतील शेतकऱ्यांच्या मधून उमटू लागला.
गतवर्षी तर सर्व शेतकऱ्यांनी आमच्या शेतीला पाणी द्या; अन्यथा आमच्या काढून घेतलेल्या जमिनी परत करा, अशी भूमिका घेतली होती़ त्यामुळे शासनाने उन्हाळा चालू होण्याच्या अगोदर पाणी साठवण्यास सुरुवात केली होती़
परिणामी, कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला होता़
सध्या नोव्हेंबर महिना सुरू झाला आहे. मात्र, तरीही धरणाचे गेट पूर्ण खुले आहे़ त्यामुळे जलाशयातील पाणी साठ्याने तळ गाठण्यास सुरुवात केली आहे़
पाणीसाठा कमी होत असल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी वर्ग चांगलाच चिंतेत अडकला आहे़ धरणाचे गेट बंद करा आणि जलाशयामध्ये पाणीसाठा करण्यास सुरुवात करा, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)
पंधरा वर्षांपासून काम सुरूच
वांग-मराठवाडी धरणाला सुरुवातीपासूनच ग्रहण लागले आहे. या धरणाचे काम अद्यापही पूर्ण झालेले नाही. सुरुवातीला चांगल्या पद्धतीने काम आटोपण्यात आले. मात्र, हळूहळू कामाचा वेग मंदावला. कधी निधीचा तुटवडा तर कधी तांत्रिक कारणास्तव काम बंद ठेवण्यात आले. अशातच धरणग्रस्तांनीही आपल्या न्याय हक्कांसाठी वारंवार आंदोलने केली. धरणाचे काम बंद पाडले. त्यामुळे पंधरा वर्षांपासून काम सुरू असूनही अद्याप धरण पूर्ण झालेले नाही.