एकीकडे धरण; दुसरीकडे मरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:35 AM2021-07-26T04:35:20+5:302021-07-26T04:35:20+5:30
वांग मराठवाडी धरणाच्या पाठीमागील बाजूस जिंती हे गाव आहे. या जिंती गावाला वाड्यावस्त्या आहेत. जिंतीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर ...
वांग मराठवाडी धरणाच्या पाठीमागील बाजूस जिंती हे गाव आहे. या जिंती गावाला वाड्यावस्त्या आहेत. जिंतीपासून सुमारे दोन किलोमीटर अंतरावर दक्षिणेला डोंगराच्या कुशीत जितकरवाडी, सावंतवाडी, शिंदेवाडी, भातडेवाडी, धनावडेवाडी या वाड्या वसलेल्या आहेत. येथील अनेक ग्रामस्थ नोकरी, व्यवसायासाठी मुंबई आणि पुण्यात वास्तव्यास आहेत, तर अनेक कुटुंबे गावात राहून शेती व्यवसाय करत आहेत. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामुळे येथील ग्रामस्थांना वन्यप्राण्यांचा उपद्रव सहन करावा लागत आहे, तर तर वांग मराठवाडी धरणामुळे येथील ग्रामस्थांच्या समस्या वाढत आहेत. सध्या जितकरवाडीच्या वरच्या बाजूला असलेला डोंगर खाली घसरल्यामुळे ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण पसरले आहे.
वांग मराठवाडीच्या धरणातील पाण्याचा फुगवटाही या गावांकडे पसरला आहे. प्रचंड पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जितकरवाडीच्या ग्रामस्थांचे नशीब बलवत्तर असून घरांपासून काही अंतरावर दरड कोसळली आहे. येथील कुटुंबांवर मृत्यूची टांगती तलवार कायम असल्याने ग्रामस्थांची झोप उडाली आहे