उंडाळेसह डोंगरी भागात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:40 AM2021-07-28T04:40:11+5:302021-07-28T04:40:11+5:30
उंडाळे : गेल्या दोन दिवसांपासून उंडाळेसह डोंगरी भागातील येवती, येळगाव, भुरभुशी या परिसरातील बहुतांश गावांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः जनजीवन ...
उंडाळे : गेल्या दोन दिवसांपासून उंडाळेसह डोंगरी भागातील येवती, येळगाव, भुरभुशी या परिसरातील बहुतांश गावांमध्ये मुसळधार पावसाने अक्षरशः जनजीवन विस्कळीत केले. सतत पडत असलेल्या पावसाने या परिसरातील अनेक पाझर तलाव तुडुंब भरले आहेत.
यामध्ये येवती येथील धरण शंभर टक्के भरले आहे, तर उंडाळे येथील धरण, घोगाव येथील धरण, गोटेवाडी येथील धरणही तुडुंब भरले आहे. अजूनही या परिसरात प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असल्याने शेतामध्ये पाणी साचल्याने भुईमूग, सोयाबीन, भात या पिकांचे नुकसान झाले आहे. सतत पडत असलेल्या पावसाने महासोली आणि शेवाळेवाडी येवती येथील पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक काही काळ बंद होती; तर या परिसरातील बहुतांश गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला होता. सतत पडत असलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेली पिके वाया गेल्याने शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे.
चौकट
चाळीस कुटुंबांचे स्थलांतर
कऱ्हाड दक्षिण विभागातील दक्षिण मांड व वांग नदीला पूर आला. नांदगाव व टाळगाव येथील चाळीस कुटुंबीयांचे स्थलांतर केले आहे, तर शेवाळेवाडी घोगाव येथील पाझर तलावाला भगदाड पडले आहे. खोचरेवाडी तलावाचा सांडवादेखील कमकुवत झाला असून तो फुटला आहे. उंडाळे तलावाच्या पाण्याने संरक्षण भिंत तुटल्याने जिंती येथील रस्ता खचला आहे. या सर्व परिस्थितीची पाहणी जिल्हा परिषदेचे सदस्य उदयसिंह पाटील यांनी केली व या परिसरातील नुकसानीबाबत तहसीलदार, गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून नुकसानीबाबत माहिती दिली.
फोटो : २७उंडाळे
कऱ्हाड ते चांदोली रस्त्यावर उंडाळे तलावाचे पाणी आल्याने काही काळ वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. (छाया : ज्ञानेश्वर शेवाळे)