औंध-गोपूज परिसरात नुकसान डोंगररांगा काळवंडतायत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:37 AM2021-03-06T04:37:12+5:302021-03-06T04:37:12+5:30
औंध : औंध परिसरातील गोपूज, खबालवाडी, घाटमाथा परिसरात लागलेल्या वणव्यामुळे त्या-त्या परिसरात वृक्षसंपदेचे मोठे नुकसान झाले असून, वणवा लागला ...
औंध : औंध परिसरातील गोपूज, खबालवाडी, घाटमाथा परिसरात लागलेल्या वणव्यामुळे त्या-त्या परिसरात वृक्षसंपदेचे मोठे नुकसान झाले असून, वणवा लागला की लावला, याविषयी चर्चा सुरू असून, असे प्रकार करणाऱ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे.
औंध आणि परिसरातील डोंगररांगा एक निसर्गाची देण असलेला परिसर असून पर्यटक, वाहनधारक, भाविक-भक्तांना आपल्या सौंदर्याने वेधून घेत असतात. या लागलेल्या वणव्यात अनेक छोटे-मोठे जीवजंतू, प्राणी, कीटक, पक्ष्यांचा नाहक बळी गेला असून, याला जबाबदार कोण, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवडीचा कार्यक्रम हाती घेऊन लाखो झाडे, बियांचे रोपण केले. त्यानंतर त्या झाडांचे रक्षण व्हावे म्हणून पिंजरा, कापड लावण्यात आले. त्यापैकीच काही झाडे या परिसरात जोर धरू लागत असतानाच लागलेल्या या वणव्यामुळे नव्या व जुन्या झाडांना आगीची झळ लागल्याने झाडांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच जीवजंतूही होरपळून मृत्युमुखी पडले आहेत. समाजविरोधी, निसर्गविरोधी काम करणाऱ्या समाजकंटकाना वेळीच आवर घालून त्यांच्यावर ठोस कारवाईची मागणी होत आहे.
चौकट:
यंदाची झळ बांधापर्यंत
मागील दोन दिवसांपूर्वी गोपूज येथे लागलेल्या वणव्याची आग डोंगरावरून अगदी खाली शेती असणाऱ्या हातातोंडाशी आलेल्या ज्वारी पिकापर्यंत येऊन पोहोचल्याने शेतकऱ्यांचा काळजाचा ठोका चुकला होता.
०५गोपूज
फोटो: गोपूज (ता. खटाव) नजीकच्या डोंगररांगा मागील दोन दिवसांपूर्वी काळवंडून गेल्या आहेत. (छाया : रशीद शेख)