जिल्ह्यात सव्वाचार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2021 04:41 AM2021-07-28T04:41:26+5:302021-07-28T04:41:26+5:30
सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील ...
सातारा : जिल्ह्यातील अतिवृष्टीत नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये महाबळेश्वर, पाटण आणि जावळी तालुक्यातील पिकांची सर्वाधिक हानी झाली आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये भात, नाचणी, सोयाबीन, ऊस, भाजीपाल्याचा समावेश आहे.
जिल्ह्यात मागील आठवड्यात अतिवृष्टी झाली. पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, नवजा, महाबळेश्वर, कोयना भागात धुवाधार पाऊस पडत होता. या पावसाचा फटका सर्वाधिक महाबळेश्वर, सातारा, जावळी, वाई, कऱ्हाड आणि पाटण तालुक्याला बसला. तसेच अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील जमिनी वाहून गेल्या. यामुळे खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार नजरअंदाजे ४३७३ हेक्टरवर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
अतिवृष्टीमुळे सर्वाधिक नुकसान महाबळेश्वर तालुक्यात झाले आहे. या तालुक्यातील नजरअंदाजे १०५० हेक्टरवरील पिकांना फटका बसलाय. यामध्ये भात, नाचणी या पिकांचा समावेश आहे, तर यानंतर पाटण तालुक्यात ९५० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले. पाटणमध्येही भात आणि नाचणी पिकांचीच हानी झाली आहे. जावळी तालुक्यात ८०६ हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले. जावळीत भात, नाचणीबरोबरच सोयाबीन पिकांना फटका बसला आहे.
कऱ्हाड तालुक्यातही नजरअंदाजे ७६७ हेक्टरवरील पिकांना फटका बसला आहे. या तालुक्यात भात, सोयाबीन, ऊस आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. पाठीमागे झालेल्या पावसातही कऱ्हाड तालुक्यात भाजीपाल्याला अधिक फटका बसलेला. वाई तालुक्यात ५५० हेक्टरवरील भात, नाचणी आणि सोयाबीन या पिकांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर सातारा तालुक्यातही २५० हेक्टरवरील क्षेत्राचे नुकसान झाले. साताऱ्यात भात, नाचणी आणि सोयाबीन पिकांची हानी झाली आहे.
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. पंचनामे करण्यासाठी आणखी काही दिवस लागू शकतात, असा अंदाज आहे. त्यानंतर पीक नुकसानीचा खरा आकडा समोर येणार आहे.
चौकट :
७८६ हेक्टर शेतजमीन बाधित...
अतिवृष्टीचा पिकांनाच फटका बसला नाही, तर शेत जमिनीचीही हानी झाली आहे. जिल्ह्यातील नजरअंदाजे एकूण ७८६ हेक्टर शेत जमीन बाधित झाली. यामध्ये पाटण तालुक्यातील ३५० हेक्टर शेत जमिनीचे नुकसान झाले. यानंतर महाबळेश्वर तालुका २५० हेक्टर, जावळी ८०, कऱ्हाड तालुका ४६ ,वाई ४० आणि सातारा तालुक्यातील नजरअंदाजे २० हेक्टर शेतजमिनींचे नुकसान झालेले आहे.
.................................................................