नरवणेत वारे अन् पावसामुळे फळबागांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:37 AM2021-04-13T04:37:07+5:302021-04-13T04:37:07+5:30
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील नरवणे येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वारा आणि वळवाच्या पावसामध्ये ...
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील नरवणे येथे शनिवारी सायंकाळी झालेल्या वारा आणि वळवाच्या पावसामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये चिकू, आंबा बागा, तसेच कांद्याचेही नुकसान झाले, तसेच मका, कडवळ पीक भुईसपाट झाले आहे.
नरवणे व परिसराला शनिवारी सायंकाळी वळवाच्या पावसाने चांगलाचा तडाखा दिला. यामध्ये अनिल रघुनाथ काटकर यांच्या आंबा व चिकू बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर, संजय बाळासाहेब काटकर यांची आंब्यांची ४० झाडे आहेत. या झाडांना नुकतेच लागलेले आंबे तुटून खाली पडले. त्याचबरोबर, इतरही आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे.
सध्या आंब्याचा हंगाम सुरू आहे. फळांनी आंब्याची झाडे लगडलेली असतानाच वळावाच्या पावसात नुकसान झाले आहे. त्यामुळे पडलेल्या या फळांचं करायचं काय, हा प्रश्न शेतकऱ्यांच्या समोर उभा राहिलेला आहे. त्याचबरोबर मका, कडवळ यासारखी उन्हाळी पिके भुईसपाट झाली आहेत. काही शेतकऱ्यांचा कांदा अजूनही शेतात आहे. पावसात कांदा पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेल्या बागा आणि पिकांची भुईसपाट झालेली दशा पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले आहे. हातातोंडाशी आलेला घास अस्मानी संकटाने हिसकावून घेतल्याने निराशेचे वातावरण आहे. नुकसानीची दखल शासनाने संबंधित शेतकऱ्यांना भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशीच मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
चाैकट :
वादळ आणि पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडलेली आहेत, तर काही ठिकाणी घरावरील पत्रे उडून गेले. यापूर्वीही अशाच पद्धतीने जोराचा पाऊस आला होता. त्यावेळी शंकर हनुमंत काटकर यांचे अंदाजे ६० हजार रुपयांचे बाजरी पिकाचे नुकसान झाले होते. त्याचीही दखल अद्याप शासनाने घेतलेली नाही.
कोट :
वळवाच्या पावसामध्ये नरवणे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या शेतकऱ्यांना योग्य ती मदत तत्काळ मिळावी, तरच शेतकऱ्यांना आत्मविश्वास परत मिळेल, यासाठी प्रामुख्याने शासकीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे.
- दत्तात्रय काटकर, सरपंच नरवणे
फोटो ओळ : नरवणे, ता.माण येथील अंकुश काटकर यांच्या आंब्याच्या बागेचे वारा आणि पावसाने मोठे नुकसान झाले आहे. (छाया : सिद्धार्थ सरतापे)