वादळी पावसाने रब्बीसह ऊस, पालेभाज्या पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2021 04:29 AM2021-02-19T04:29:07+5:302021-02-19T04:29:07+5:30
दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली होती. ...
दोन दिवसांपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. बुधवारी दुपारी १२ वाजल्यापासूनच आकाशात ढग जमा होण्यास सुरुवात झाली होती. पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र आज झालेल्या पावसाने गहू, शाळू, हरबरा अशा रब्बी हंगामातील पिके काही ठिकाणी भुईसपाट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मलकापूर, कापील, जखिणवाडी, नांदलापूर, चचेगावसह परिसरात भाजीपाला पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे . सध्या पालक, मेथी, कोथिंबीर या पालेभाज्यांसह टमाटा, दुधी भोपळा, काकडी, कारले, ही वेलवर्गीय पिकेही घेतली जातात. भेंडी, गवारी, गेवडा यांसारख्या शेंगवर्गीय भाज्यांवर किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आज झालेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाज्यांच्या रानात पाणी साचल्याने या पिकांचे नुकसान झाले आहे, तर जोराच्या वाऱ्याने वेलवर्गीय पिकांचे मांडव भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तोडलेला ऊस शेतातून बाहेर काढता येत नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागणार आहे. अनेक ठिकाणी आडचाली ऊस पीक भुईसपाट झाल्यामूळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे उपमार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्यामूळे दोन्ही बाजूंचे उपमार्ग जलमय झाले होते.
चौकट
अचानक आलेल्या जोरदार पावसामुळे सर्वांची चांगलीच धावपळ झाली. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी फुलशेती केली आहे. फुलांच्या शेतात पाणी साचल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
चौकट
गुऱ्हाळाची घरघर थांबली
सध्या चचेगाव परिसरातील गुऱ्हाळ घरे सुरू आहेत . मात्र बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांच्या रानात पाणी साचल्यामुळे उसाची वाहतूक करण्यात अडचणी आल्यामुळे गुऱ्हाळाची घरघर थांबवावी लागली. काही ठिकाणी तर काईल पावसात भिजून नुकसान झाले आहे.
फोटो :