वांजळे तलाव फुटल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 04:17 PM2019-09-24T16:17:46+5:302019-09-24T16:19:09+5:30
फलटण तालुक्यातील उपवळे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी, दरेचीवाडी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. यामुळे वांजळे तलाव मंगळवारी फुटले. त्यातून लाखो लिटर पाणी वाहू लागल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.
वाठार निंबाळकर : फलटण तालुक्यातील उपवळे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी, दरेचीवाडी परिसरात परतीच्या पावसाची दमदार हजेरी. यामुळे वांजळे तलाव मंगळवारी फुटले. त्यातून लाखो लिटर पाणी वाहू लागल्याने ऊस, बाजरी पिकांचे नुकसान झाले आहे.
उपळवे, जाधवनगर, सावंतवाडा, दालवडी येथे पावसाने बाजरी, कांदा, मका, डाळिंब आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर बाणगंगा नदीलगतच्या सर्व विहिरी वाहून गेल्या आहेत. सावंतवाडा येथे बाणगंगा नदीला आलेल्या पुरामुळे पाच तासांसाठी गावचा संपर्क तुटला होता.
दालवडी, मिरेवाडी रस्त्यावर बाणगंगा नदी पुलावरून पाणी वाहू लागले. यामुळे रस्ता वाहतूक बंद झाली. फलटण, उपवळे, सावंतवाडा या रस्त्यावरील मांडवखडक पूल खचून पुलाचे पाच लाख रुपयांचे नुकसान. दालवडी येथील डबचा ओढा पुलाचे पूल खचून पुलाचे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले.
उपवळे येथे बाणगंगा नदी पुलाचे पूल खचून पाच लाख रुपयांचे नुकसान, दालवडी गावची नळपाणी पुरवठा योजनेची विहीर वाहून जाऊन विहीर व मोटार तसेच इतर साहित्यांचे सात लाख रुपयांचे नुकसान झाले. तहसीलदार हनुमंतराव पाटील, गटविकास अधिकारी गावडे, तालुका कृषी अधिकारी गोरक्षनाथ डोईफोडे, सार्वजनिक बांधकाम उपअभियंता महेश नामदे यांच्यासह इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली.
बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी तातडीने जेसीबी व इतर यंत्रणाच्या साह्याने रस्ता सुरू करून दिला. तहसीलदार हणमंतराव पाटील यांनी तातडीने पिके व इतर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन प्रत्यक्षात पंचनामे सुरू केले आहेत.