धरणालगत वाळू उपसा...प्रशासनाचा कानाडोळा !
By admin | Published: March 28, 2017 04:26 PM2017-03-28T16:26:16+5:302017-03-28T16:26:16+5:30
पडलेल्या खड्ड्यांमुळे अजून किती जीव जाणार : संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई ची मागणी
आॅनलाईन लोकमत
वडूज : बोकाळलेले वाळू माफिया आणि महसूल विभागाची गांधारीच्या भूमिकेने खटाव तालुक्याची वरदान असलेल्या येरळा नदीचे पात्र अक्षरश: कुरतडले असून, ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे अजून किती जणांचे जीव जाणार? याकडे बघ्याची भूमिका घेणाऱ्या संबंधितांवर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
वाकेश्वर ग्रामपंचायतीने गत आठ दिवसांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले तरी याबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. मंडलाधिकारी व तलाठी यांच्यासह सर्वच मिलीभगत आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. वाकेश्वर येथील याच खड्ड्यामुळे एकाला आपला जीव गमवावा लागला होता तर अंबवडे मधील शाळकरी चिमुकल्यांचा दुदेर्वी अंत ही झाला होता. मग अजून प्रशासन किती जणांच्या बलिदानाची वाट बघतेय, अशा प्रतिक्रिया सर्वसामान्यांच्या मधून उमटत आहेत.
निर्ढावलेले वाळू माफिया आणि त्यांना साथ देणारे महसूल कर्मचारी यांच्यावर कारवाई न झाल्याने तालुक्यात सध्या उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धरणालगत बेकायदेशीर वाळू उपसा तर प्रशासनाचा मात्र कायम कानाडोळा का? तर याठिकाणी असणाऱ्या शेतकऱ्यांनाही दमदाटी चे प्रकार घडून देखील सर्वच बाबतीत फक्त सारवासारव प्रकार पाहावयास मिळत आहे. तसेच वाकेश्वर हद्दीतील पात्राची चाळण बघून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे स्पष्ट होत आहे.
कायम दुष्काळी भाग म्हणून ओळखणारा खटाव तालुक्यातील बहुतांशी गावांना येरळवाडी मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो. तसेच धरणालगतच्या काही गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा होत असतो. सध्या तर धरणालगतच अवैद्यरीत्या वाळू उपसा करत असल्याने मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असून, भविष्यात मोठा पाऊस झाल्यास धरणाला धोका संभविण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत. काही दिवसांपूर्वी धरणालगत असणारी झाडेही अवैद्यरीत्या तोडण्यात आल्याने वाळूमाफियांना वाळू चोरी करण्यास आयते रान मोकळे केल्याचे बोलले जात आहे.