धरणग्रस्त कार्यकर्त्याची आत्महत्या
By admin | Published: October 7, 2014 11:04 PM2014-10-07T23:04:05+5:302014-10-07T23:50:57+5:30
उमरकांचन येथील घटना : कारवाईच्या भीतीने गळफास घेतल्याचा आरोप
ढेबेवाडी : उमरकांचन, ता. पाटण येथील काशिनाथ हरिबा मोहिते (वय ४५) या धरणग्रस्त कृती समितीच्या कार्यकर्त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली.
पोलिसांच्या भीतीने काशिनाथ यांनी आपली जीवनयात्रा संपविल्याचा आरोप करीत नातेवाईक, संघटनेचे कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यास नकार दिला. परिणामी, रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, उमरकांचन येथील काशिनाथ मोहिते यांचा धरणग्रस्त कृती समितीमध्ये सक्रिय सहभाग होता. कृती समितीने वेळोवेळी केलेल्या आंदोलनांमध्ये ते सहभागी होत होते. काही महिन्यांपूर्वी झालेल्या आंदोलनप्रकरणी पोलिसांनी कृती समितीच्या इतर कार्यकर्त्यांसह काशिनाथ यांच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचे समन्स बजावण्यासाठी सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ढेबेवाडी पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी उमरकांचनमध्ये गेले होते. त्यांनी ज्या-ज्या कार्यकर्त्यांच्या नावे समन्स होती, त्यांना गाठले. त्यावेळी संबंधित कार्यकर्त्यानी ‘समन्स तोडून उद्या पावती देतो,’ असे पोलीस कर्मचाऱ्यांना सांगितले. मात्र, त्यानंतर मंगळवारी पहाटेही काही पोलीस उमरकांचनमध्ये गेले होते. अशातच मंगळवारी सकाळी गावापासून शंभर मीटर अंतरावर सागवणाच्या झाडाला काशिनाथ यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. (पान १० वर)
पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा
‘नर्मदा बचाव’ आंदोलनच्या नेत्या सुनीती सु. र. यांनीही घटनास्थळी भेट दिली. यावेळी सुनीती सु. र. म्हणाल्या, ‘शासन, प्रशासन व पोलिसांनी केलेली ही हत्या आहे. त्यामुळे धरणग्रस्तांवर खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर व उमरकांचनमध्ये आलेल्या पोलिसांवर गुन्हे दाखल करावे.’