आनंदाच्या गुढीला नसे श्रीमंतीचा बांध
By Admin | Published: March 22, 2015 12:15 AM2015-03-22T00:15:17+5:302015-03-22T00:15:17+5:30
जिल्ह्यात गुढीपाडवा उत्साहात साजरा : रिक्षांवरही उभारल्या गुढ्या; झोपड्यांमध्ये झाले पूजन
सातारा : जिल्ह्यात घरोघरी गुढ्या उभारून नवीन मराठी वर्षाचे स्वागत उत्साहात करण्यात आले. ऊसतोड मजुरांनी आपल्या झोपड्यांमध्ये गुढी उभारून आनंदाच्या या गुढीला श्रीमंतीचा बांध आडवा येत नसल्याचे दाखवून दिले तर रिक्षाचालकांनीही आपल्या रिक्षावर गुढी उभारून शहरभर अभिमानाने मिरविली.
गुढीपाडव्यानिमित्त महिलांनी सकाळी घरासमोर गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखविला. त्यानंतर कडुलिंब, गुळाचे मिश्रण सर्वांना वाटण्यात आले. मनातील कटुता दूर करून एकमेकांप्रती गोडवा निर्माण करणारा हा सण जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.
गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ सजली होती. विविध प्रकारच्या रेडिमेड गुढ्या बाजारपेठेत विक्रीसाठी आल्या होत्या. रिक्षाचालकांनी आपल्या रिक्षावरही गुढी उभारून शहरभर मोठ्या अभिमानाने मिरविली. तर दुकानदारांनीही रेडिमेड गुढी आणून आपल्या दुकानातील टेबलावर ठेवून तिचे पूजन केले.
रात्रीपासूनच गुढीसाठी बांबू मिळविण्याची धडपड सुरू होती. सातारा शहरात काही ठिकाणी बांबू विकत मिळत असल्यामुळे बांबू खरेदीसाठी लगबग सुरू होती.
शनिवारी सकाळी महिलांनी बांबूला नवीन साडी लावून त्यावर पितळेचे भांडे ठवून साखरगाठीच्या माळा अडकविल्या. त्यानंतर सातारा शहरात पुरुष मंडळींनी घरासमोर गुढी उभारून पूजन करण्यात आले. (प्रतिनिधी)