मायणी परिसरामध्ये बंधाऱ्यांमुळे पाणीसाठा टिकून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:38 AM2021-03-26T04:38:54+5:302021-03-26T04:38:54+5:30
मायणी : मायणी परिसरामध्ये विविध गावांमध्ये यावर्षी उन्हाळ्यात सिमेंट साखळी बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा टिकून आहे. वर्षभर सिमेंट बंधाऱ्यांमध्ये ...
मायणी : मायणी परिसरामध्ये विविध गावांमध्ये यावर्षी उन्हाळ्यात सिमेंट साखळी बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा टिकून आहे. वर्षभर सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा शिल्लक राहिल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढली असल्याने किमान यावर्षी तरी परिसरातील नागरिकांना पाणीटंचाई जाणवणार नाही. अजूनही साखळी बंधारे होणे गरजेचे आहे.
प्रतिवर्षी मायणी परिसरातील अनफळे, कानकात्रे, विखळे, कलेढोण, पाचवड, मुळकवाडी, तरसवाडी, ढोकळवाडी, कान्हरवाडी, हिवरवाडी, कानकात्रे (विठ्ठलनगर) या गावांसह परिसरातील वाड्या-वस्त्यांमध्ये जानेवारी-फेब्रुवारी महिना सुरू झाला की, पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होत असतो. परिसरातील विहिरी ओढे-नाले पूर्ण कोरडे पडत असतात; यामुळे परिसरातील नागरिकांच्या, तसेच पशु व जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी करावी लागते.
२०१९ च्या सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे व गतवर्षी जुलै, ऑगस्ट या पावसाळी वातावरणाच्या काळामध्ये परिसरात चांगला पाऊस झाला तसेच गेल्या अनेक वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मोठ्या प्रमाणात लोकसहभाग, शासनाच्या मदतीतून व खासगी संस्थांच्या सहकार्यातून मातीबांध, नालाबांध, पाझर तलाव, तसेच ओढ्यांवर व नाल्यांवर साखळी सिमेंट बंधाऱ्यांची कामे मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे व अवकाळी पाऊस व गतवर्षी जुलै ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत झालेल्या पावसामुळे बंधाऱ्यात या दोन्हीवेळी झालेल्या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साठले.
तसेच जलसंधारण पाणलोट व विविध खासगी संस्थांच्या मदतीने झालेल्या या कामांमध्ये पाणी साठल्याने जमिनीत चांगल्या प्रकारे पाणी मुरल्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाली. त्यामुळे आज मार्च महिना संपत आला तरीही मायणी परिसरातील कोणत्याही गावाने पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी शासनाकडे टँकरची मागणी केलेली नाही. शिवाय आज मार्चअखेरही परिसरातील अनेक सिमेंट बंधाऱ्यांमध्ये पाणीसाठा आहे. या पाणीसाठ्यामुळे जमिनीतील पाणी पातळी अजूनही टिकून आहे.
(चौकट)
शासन प्रतिवर्षी दुष्काळी पट्ट्यातील गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करते. मात्र, यावर्षी टँकरची गरज भासणार नाही. त्यामुळे टँकरवर होणाऱ्या खर्चाचे पैसे जलसंधारण व पाणलोटच्या कामासाठी खर्च करणे गरजेचे आहे.
चौकट-
मायणी ब्रिटिशकालीन तलावापासून असलेल्या चांद नदीवर सहा ते सात ठिकाणी सिमेंट बंधारे झाले आहेत. या सिमेंट बंधाऱ्यांमध्ये अजूनही पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे याच नदीवर अजून शक्य आहे त्या ठिकाणी व लोकांच्या मागणीनुसार बंधारे बांधले, तर पावसाळ्यातील पाणी यामध्ये शिल्लक राहील व दुष्काळी पट्ट्यातील या गावाला टँकरची गरज भासणार नाही.
- सचिन देशमुख,
सामाजिक कार्यकर्ते
मायणी (ता. खटाव) येथील चांद नदीपात्रात सिमेंट बंधारे बांधल्यामुळे या बंधाऱ्यात मुबलक पाणीसाठा टिकून आहे. (छाया : संदीप कुंभार)